‘अल्पवयीन’ आरोपींच नरदेहातील सैतान

नवी दिल्ली: राजधानीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकारात ‘अल्पवयीन’ आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक बाब पीडीत युवतीच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या जबाबातून पुढे आली आहे. या आरोपीच्या अमानुष वागणुकीचा विचार करून त्याच्यावर इतर सज्ञान आरोपींप्रमाणे खटला चालविला जावा आणि त्याला त्याचप्रमाणे कडक शिक्षा व्हावी यासाठी दिल्ली पोलीस उच्च न्यायालयात दाद मागता येईल काय; याचा विचार करीत आहेत.

दिल्लीत दि. १६ डिसेंबर रोजी रात्री चित्रपट पाहून घरी निघालेल्या २३ वर्षीय युवतीवर ६ जणांनी निर्घृण बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्राला लोखंडी गजाने मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्थेत असलेली पीडीत युवती आणि तिच्या मित्राला रस्त्यावर फेकून दिले. या आरोपींपैकी ५ जणांवर दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सहाव्या अल्पवयीन आरोपीवरील खटला बालन्यायालयात चालविला जाणार आहे. कायद्याप्रमाणे कोणत्याही अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाच्या कैदेपेक्षा अधिक शिक्षा करता येत नाही. मात्र या गुन्ह्यातील या अल्पवयीन आरोपीच्या सहभागाचे गांभीर्य आणि त्याची अमानुष पाहता त्याला एवढ्या किरकोळ शिक्षेनंतर मोकळे सोडणे म्हणजे समाजात एका सैतानाला मोकळे सोडण्यासारखे ठरेल; अशी सर्वसामान्य नागरिकांचीच नव्हे; तर पोलिसांचीही भावना आहे. त्या दृष्टीने काय करता येईल; याची चाचपणी पोलीस आणि कायदेतज्ञ करीत आहेत.

बस द्वारका येथे निघाली आहे. तुम्हाला तिथे नेऊन सोडतो; असे सांगून याच ‘अल्पवयीन’ आरोपीने पीडीत युवती आणि तिच्या मित्राला बसमध्ये घेतले. इतर आरोपींबरोबर या आरोपीने युवतीवर बलात्कार केलाच! याशिवाय मारहाणीनंतर पीडीत युवती बेशुद्ध झाल्यानंतरही पुन्हा तिच्यावर पाशवी बलात्कार करण्याचे अघोरी कृत्य या अल्पवयीन आरोपीने केले; असे पीडीत युवतीच्या मित्राने पोलिसांना सांगितले. याशिवाय ही मुलगी मेली आहे. या दोघांना बसमधून फेकून देऊ; असेही याच ‘अल्पवयीन’ आरोपीने इतरांना सुचविले.

अशा नरदेहातील सैतानाला केवळ ३ वर्षाची शिक्षा देणे ही न्यायाची विटंबना ठरणार आहे. त्यामुळे हा आरोपी अल्पवयीन असला तरीही त्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कायद्यातील तांत्रिक तरतुदींच्या आधारावर त्याला मोकळे सोडले जाऊ नये; त्यालाही फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment