पुणे दि.४ – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी राष्ट्रवादीचा प्री इलेक्शन प्लॅन तयार झाला असून या योजनेवर दीर्घ चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुण्यात जानेवारीत बैठक होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बैठकीसाठी पुण्याची निवड करण्यामागे पुणे हे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होम ग्राऊंड असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित केल्यामुळे पुणे शहरात काँग्रेसची परिस्थिती वाईट झाली आहे हे लक्षात घेऊन निवडणुकात युती झालीच तर पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादीच मागणार आहे असेही समजते.
राष्ट्रवादीतील एका वरीष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अजून वर्षभर लांब असल्या तरी त्याची तयारी राष्ट्रवादीने आत्तापासूनच सुरू केली आहे. राज्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार आणि खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून राज्यात आमदारांची संख्या १०० वर नेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे. पुण्यावर अजित पवार यांचे पूर्ण नियंत्रण असल्याचे सांगितले जात असले तरी विधानसभेतील आठ जागांपैकी केवळ एकच राष्ट्रवादीकडे आहे.
पश्चिम महाराष्ट्रात २१ विधानसभा मतदारसंघ असून त्यातील सात राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेस व भाजपकडे प्रत्येकी चार तर सेना व अपक्षांकडे प्रत्येकी तीन मतदारसंघ आहेत.यामुळे पुण्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी नवे चेहरे यंदा राष्ट्रवादीत दिसणार आहेतच पण अन्य पक्षातील प्रभावी नेत्यांनाही राष्ट्रवादीत आणण्याचा कसून प्रयत्न केला जाणार आहे असेही हे नेते म्हणाले.