नॅनो अवतरणार नव्या रुपात

मुंबई: टाटा उद्योगसमूहाचे नुकतेच निवृत्त झालेले अध्यक्ष रतन टाटा यांनी साकारलेले ‘नॅनो’ स्वप्न अधिक आकर्षक स्वरूपात नव्याने आकाराला आणण्याचा निर्धार समूहाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी केला आहे.

मध्यमवर्गीयांना परवडेल अशी चार चाकी गाडी बनविण्याचे स्वप्न रतन टाटा यांनी पहिले आणि त्यांच्या कुशल अभियंत्यांनी ते प्रत्यक्षात उतरवले. सुरुवातीला या गाडीचे बेसिक मॉडेल केवळ १ लाख रुपयात उपलब्ध करून देण्यात आले. सध्या या गाडीची किंमत १ लाख ५५ हजार ते २ लाख १६ हजार रुपये आहे. टाटा मोटर्सने आतापर्यंत तब्बल २ लाख २० हजार नॅनोची विक्री केली आहे.

ही लोकप्रिय छोटी कार नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा नवनिर्वाचित अध्यक्षांचा मानस आहे. त्यानुसार नॅनोचे सध्याचे ६२४ सीसी क्षमतेचे इंजिन बदलून त्या जागी ९६६ सीसी क्षमतेचे अधिक शक्तिशाली इंजिन बसविता येईल काय; याची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे नव्या नॅनोला अधिक इंधन क्षमतेची टाकी आणि आकार किंचित मोठा करण्याचेही प्रयत्न सुरू केले जाणार आहेत.

नव्या स्वरूपातील नॅनो बाजारापेहेत उपलब्ध झाल्यानंतर मारुती अल्टोला मोठी स्पर्धा निर्माण होणार हे मात्र निश्चित!