जावेद मियांदादच्या संभाव्य भारत भेटीवर आक्षेप

नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा व्याही जावेद मियांदाद याच्या संभाव्य भारत भेटॆवरॊन नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भारत पाकिस्तान क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दिल्लीत होणारा सामना पाहण्यासाठी जावेद भारतात येणार आहे. आपल्याला भारतीय व्हिसा प्राप्त झाल्याचा दावा त्याने पाक प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मात्र त्याला भारतात प्रवेश देऊ नये; अशी अनेकांची भावना आहे. शिवसेनेने पूर्वीपासूनच जावेदच्या भारत भेटीला विरोध केला आहे. आता मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार जगदंबिका पाल यांनीही जावेदला व्हिसा देण्यास विरोध व्यक्त केला आहे.

या आधी ८ वर्षापूर्वी जावेदने क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने भारताला भेट दिली होती त्यावेळी तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही भेटला होता. जावेदचे कुटुंब फाळणीपूर्वी भारतातून कराचीला स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात येते काही वर्षापूर्वी जावेदनेही याला दुजोरा दिला.

दाऊदची मुलगी माहरुख हिचा सन २००५ मध्ये जावेदचा मुलगा जुनेद याच्याबरोबर दुबई येथे विवाह झाला. या विवाहाला दाऊद उपस्थित नसल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment