ट्विट ट्विट करू नका: थरूर यांना ताकीद

नवी दिल्ली: ट्विटरवर वादग्रस्त विधाने करून अनेकदा अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना काँग्रेसने पुन्हा एकदा त्याबद्दल ताकीद दिली आहे. आपली मते ट्विटरवर प्रसिद्ध करण्यापेक्षा सरकारच्या आणि काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर आपले म्हणणे मांडा; असे थरूर यांना सुनावण्यात आले आहे.

धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीची ओळख दडवून ठेवण्याने काय साधणार आहे; असा सवाल थरूर यांनी ट्विटरवर केला होता त्यापेक्षा महिला सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या सुधारित कायद्यांना तिचे नाव द्या; असे आवाहनही त्यांनी केले होते. यावरून मोठे वादंग माजले. बलात्कारित युवती आपली कन्या असती तर तिचे नाव जगजाहीर करणे आपल्याला चालले असते काय; असा सवालही थरूर यांना सोशल मिडियाद्वारे विचारला गेला. मात्र पीडीत युवतीच्या कुटुंबियांनी सुधारित कायद्यास आपल्या मुलीचे नाव देण्यास सहमती दर्शविल्याने या वादावर सध्या तरी पडदा पडला आहे.

यापूर्वीही सन २००९ मध्ये थरूर यांनी विमानातील ‘इकॉनॉमी क्लास’ म्हणजे जनावरांचा गोठा असल्याचे ट्विट करून देशभर खळबळ उडवून दिली होती. त्याचप्रमाणे गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी आपली पत्नी अनमोल असल्याचे ट्विट केले होते. त्यावर निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सुनंदा पुष्कर थरूर या तर ५० कोटीची गर्लफ्रेंड;’ अशा शब्दात थरूर यांच्या विधानाची संभावना केली होती.

Leave a Comment