नयना पुजारी खून खटला सुनावणी ८ जानेवारीपासून

पुणे दि. १- सॉफटवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिचा गँगरेप आणि खून केल्याप्रकरणी दीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या खटल्याची सुनावणी अखेर ८ जूनपासून जिल्हासत्र न्यायालयात सुरू होत आहे असे समजते. खराडी येथील कंपनीत काम करत असलेल्या नयना पुजारी या विवाहित महिलेचे ८ आक्टोबर २००९ रोजी अपहरण करून तिच्यावर गँगरेप करून तिचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह राजगुरूनगर जवळील जंगल भागात मिळाला होता. दगडाने डोके व चेहरा ठेचून तिची हत्या झाली होती.

याविषयीही माहिती अशी की ८ आक्टोबर रोजी कंपनीची पिकअप व्हॅन चुकल्याने नयना पुजारी बसस्टॉपवर उभ्या होत्या तेव्हा टॅक्सीतून आलेल्या चौघांनी त्यांना लिफ्ट देण्याची तयारी दाखविली. पुजारी यांनी आपल्या पतीला तशी कल्पना फोनवरून दिली होती. मात्र कारमधील चौघांनी तिचे अपहरण करून तिच्या डेबीड कार्डचा जबरदस्तीने वापर करायला लावन तिच्याकडून ६१ हजार रूपये उकळले . नंतर तिच्यावर बलात्कार केला. मात्र चौघातील एक जण त्याच कंपनीत ताप्तुरता सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे कळल्यावरून व ती ओळख पटवेल या भीतीने तिचा खून केला होता.

पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या चौघातील प्रमुख संशयित योगेश राऊत याने ससूनमध्ये उपचारासाठी नेले असता पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला तो अद्यापीही पोलिसांना सापडलेला नाही. माफीचा साक्षीदार केलेल्या चौधरीने आपल्याला माफीचा साक्षीदार करू नये अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयाला केला होता तसेच या अर्जाला आव्हान देणारी याचिका अन्य आरोपी महेश ठाकूर याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. या व अशा अनेक कारणांनी हा खटला दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता.

१७ नोव्हेंबर २०११ ला फरारी झालेल्या राऊतच्या कुटुंबियांची जबानी पोलिसांनी नोंदविली आहे. राऊत याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते मात्र त्याच्या नावावर मालमत्ताच नसल्याचे आढळले आहे. त्याच्या कुटुंबिय आणि मित्रांवर सतत पाळत असूनही पळून गेल्यानंतर तो कुणालाच भेटलेला नाही असे पोलिसांनी सांगितले. नवीन साक्षीदारांची यादी न्यायालयाला सादर करण्यात आली आहे. अखेर ८ जानेवारीपासून या खटल्याची सुनावणी सुरू होत असून ८४ साक्षीदार तपासले जाणार आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश अनंत बदर यांच्यापुढे ही सुनावणी होणार आहे.

Leave a Comment