सामूहिक बलात्कार: आरोपीचे घर उडविण्याचा प्रयत्न फसला

नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी बसचालकाचे घर बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांमुळे फसला. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत. अटक केलेल्या तरुणाकडून पोलिसांनी २ क्रूड बॉम्बही हस्तगत केले आहेत.

साऱ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी रामसिंग हा दक्षिण दिल्लीतील आर. के. पूरम परिसरातील रविदास झोपडपट्टीत राहतो. सोमवारी संध्याकाळी तीन तरुण रामसिंगचे घर शोधत या परिसरात आले. त्यांनी घरातील महिलेला घरातून बाहेर जाण्यास सांगितले आम्ही हे घर बॉम्बने उडवून देणार आहोत; असेही त्यांनी या महिलेला धमकावले. घाबरलेली महिला धावतच घराबाहेर आली आणि तिने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविली.

स्थानिक नागरिकांनी या हल्लेखोरांना थांबविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस येताना पाहून हल्लेखोर पळून जाऊ लागले. त्यापैकी दोघांना पळून जाण्यात यश आले. एकाला मात्र स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अमानुष रित्या करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारानंतर समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील एक आरोपी तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना कैद्यांनी त्याला मारहाण केली होती.

Leave a Comment