कायदा सुधारणेसाठी सर्वपक्षीय बैठक: शिंदे

नवी दिल्ली: महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांना अधिक कठोर शिक्षा करण्यासाठी फौजदारी कायद्यात अपेक्षित बदलांबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रित करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कारात बळी पडलेल्या युवतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतरही राजधानीत आणि देशाच्या विविध भागात नागरिकांची; विशेषत: युवा वर्गाची उत्स्फूर्त आंदोलने सुरूच आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचारांबाबत अधिक कठोर कायदे करण्याबाबत सरकार काही पावले उचलत आहे; याची खात्री पटेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील; असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय चर्चेची घोषणा केली.

मात्र केंद्र शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक लगेच आयोजित केली जाणार नसून कायद्यातील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. जे. एस. वर्मा यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडून एक महिन्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यावर ही बैठक घेण्यात येईल.