धोनीला निवड समितीची ‘कारणे दाखवा’ नोटीस

नवी दिल्ली:एकेकाळी विजिगीषु वृत्तीने नावाजलेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मागील बराच काळ मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या निवड समितीने कर्णधाराला चक्क ‘कारणे दाखवा’ नोटीसच बजाविली आहे.

इंग्लंड विरुद्ध मालिका पराभवाने भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर क्रिकेट निवड समिती नाराज झाली आहे. पराभवाची मालिका खंडीत करून विश्वचषक-२०१५ च्या विजयासाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्याचे आदेश निवड समितीने धोनीला दिले आहेत. त्याचप्रमाणे इंग्लंड पराभवाची कारणमीमांसा सादर करण्यासही धोनीला सांगण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर विश्वचषक २०१५ साठी कोणते खेळाडू संघासाठी आवश्यक आहेत; त्याकडे लक्ष ठेवण्याची सूचना करून विश्वचषक-२०१५ साठी धोनीच कर्णधार असेल; असेही निवड समितीने सूचित केले आहे.

भारताचे माजी कर्णधार ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांनी मात्र निवड समितीच्या या सूचनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विश्वचषक स्पर्धेसाठी मोठ कालावधी बाकी असताना आत्ताच त्यासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. धोनीने देखील चिंतनाला वेळ मिळावा यासाठी काही काळ कर्णधार पदापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविणे ही निश्चितपणे अभिमानाची बाब आहे. मात्र त्याच बरोबरीने मैदानावरील दबाव आणि अपेक्षांचे ओझे पेलणे तेव्हढेच आव्हानात्मक आहे. त्यासाठी धोनीने कर्णधार पदापासून काही काळ दूर राहून चिंतन करावे; असा सल्ला गावसकर यांनी दिला.

Leave a Comment