टीम इंडियाने लाज राखली

अहमदाबाद: युवराज सिंगच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या टी -२० सामन्यात पाकिस्तानवर ११ धावांनी विजय संपादन केला. या विजयाने टीम इंडियाने देशाची लाज राखली आहे.

या सामन्यात युवराजने आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी साकारली. त्याने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या सहाय्याने केवळ ३६ चेंडूत ७२ धावा काढल्या. युवराजला साथ देणाऱ्या कर्णधार धोनीने ३३ धावा काढल्या. अखेरच्या षटकात तो बाद झाला. सुरुवातीला फलंदाजी करताना भारताच्या गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी ५ षटकात ४४ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर फलंदाजीला उतरलेला विरत कोहली जम बसत असतानाच धावबाद झाला. शंभर धावा होण्यापूर्वीच ३ गाडी गमावलेली टीम इंडिया अडचणीत असताना युवराज आणि धोनीने डाव सावरत भारताला २० षटकात १९२ धावांच्या सुरक्षित स्थितीत नेऊन ठेवले.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पाक सलामीवीरांनी पहिल्या १० षटकात ७४ धावांची चांगली सुरुवात करून दिली. दहाव्या षटकात आर. अश्विनने नसीर शमशेद (४१) याला कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच षटकात युवराजने दुसरा पाक सलामीवीर अहमद शहजाद (३१) याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर उमर अकमल आणि कप्तान हाफीज यांनी स्फोटक फलंदाजी करीत ६२ धावांची भागीदारी केली. हाफिजने कर्णधाराला साजेशी खेळी करीत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केले. अकमलचा (२४) त्रिफळा उध्वस्त करीत अशोक दिंडा याने ही भागीदारी संपुष्टात आणली. भुवनेश्वरने पाकिस्तानचा धोकादायक फलंदाज शाहीद आफ्रिदी (११) याला रोहित शर्माद्वारे झेलबाद केले. दिंडाने १९ व्या षटकात जोमदार फलंदाजी करणाऱ्या हाफीजला (५५) सुरेश रैनाच्या हाती झेल देऊन तंबूत धाडले. याच षटकात दिंडाने कामरान अकमल याला कोहलीकडून झेलबाद केले.

अखेरच्या षटकात विजयी लक्ष्य गाठणे पाक संघाला शक्य झाले नाही.

Leave a Comment