उत्तर भारतात थंडीचे ४० बळी

नवी दिल्ली: उत्तर आणि पूर्व भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला असून थंडीमुळे ४० जणांचे बळी गेले आहेत. त्यापैकी ३० जण उत्तरप्रदेशात गुरुवार संध्याकाळपर्यंत केवळ २४ तासात मरण पावले.
उत्तरेतील बहुतेक राज्यात तापमानाचा पारा ४ अंश सेल्सिअसच्या खाली पोहोचला असून सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे उत्तरेतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

थंडीपासून गरीब आणि बेघरांना बचाव करता यावा यासाठी उत्तरप्रदेश राज्य शासनाने ब्लेण्केट वाटपासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये ब्ल्ण्केट खरेदीची निविदा प्रक्रिया लाल फितीत अडकून पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने बेघरांसाठी १७ निवारागृह उभारली आहेत. मात्र या निवारागृहात कोणत्याच सुविधा नसल्याने निवाऱ्यासाठी आलेल्या लाभार्थीना अंथरूण, पांघरूणाअभावी अक्षरश: जमिनीवर झोपावे लागत आहे.

थंडीच्या लाटेने गुरुवारी पंजाबात ३ तर बिहारमध्ये ११ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्रिपुरा येथे धुक्यातून प्रवास करणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याने तिघांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशात मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नसून स्थानिक नागरिक आणि पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद उपभोगत आहेत.

Leave a Comment