वाहने वाढली, रस्त्यांचे काय ?

नाट्य – चित्रपट कलावंत आनंद अभ्यंकर आणि डॉ. अक्षय पेंडसे यांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू आल्यामुळे मराठी कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहेच पण एक्स्प्रेस हायवेवर सुध्दा अपघात होऊ शकतात हे लक्षात येऊन मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सहा आणि आठ पदरी  असे रुंद रस्ते तयार केले असून सुध्दा तसेच अशा रस्त्यांवर वाहनांची समोरासमोर टक्कर होण्याची शक्यता नसतानासुध्दा अशा प्रकारचे अपघात होत आहेत. याचा अर्थ या रस्त्यांवरून जाणार्याा वाहनांच्या वाहकांना हा रस्ता कसा वापरायचा याची अक्कल आलेली नाही असाच होतो.

असा एखादा अपघात झाला की अपघाताच्या कारणांची चर्चा सुरू होते. साधारणतः अपघातग्रस्त गाडी चालवणार्यााचा काही तरी दोष असतो असे मानले जाते. मात्र या दोन कलाकारांना झालेल्या अपघातामध्ये  अपघातग्रस्त गाडीचा काहीही दोष नव्हता. समोरून येणारा एक टेम्पो तिच्यावर आदळला आणि त्यात हा अपघात झाला. अशा रुंद रस्त्यांवर रोड डिव्हायडर असतात. वाहन चालवणार्यााचा वाहनावरचा ताबा थोडा बहुत सुटला तरी त्याचे वाहन डिव्हायडरला धडकते. कोणत्याही स्थितीत ते समोरून येणार्याय वाहनाला धडकू शकत नाही. भिन्न दिशेने जाणार्याव वाहनांचे रस्ते भिन्न असतात. त्यांच्या मध्ये रस्ता दुभाजक असतो. त्यामुळे अशा मोठ्या हायवेवर होणार्याा अपघातांची संख्या बरीच मर्यादित झालेली आहे. मात्र आनंद अभ्यंकर आणि डॉ. अक्षय पेंडसे यांचे जीव घेणारा तो टेम्पो एवढा भरधाव होता की त्याच्यावरचा वाहकाचा ताबा सुटून तो टेम्पो रोड डिव्हायडरला ओलांडून अभ्यंकर यांच्या गाडीवर आदळला.

अशा प्रकारे रोड डिव्हायडर ओलांडून धडक लागून होणारे अपघात या हायवेवर वाढलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये असे ३३ अपघात झाले. अशी पोलिसांकडे नोंद आहे आणि या३३ अपघातांमध्ये २१ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. रोड डिव्हायडरची उपयुक्तता शून्यवत वाटावी असे हे प्रकार आहेत. या टेम्पोला नेमके काय झाले होते हे कळायला मार्ग नाही. कारण टेम्पोचा ड्रायव्हर पळून गेलेला आहे. भारतामध्ये रस्त्यांवरच्या अपघातामध्ये लोक मरण्याचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. लोकांच्या मृत्यूचे ते एक मोठे कारण ठरत आहे. देशामध्ये अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी असतात परंतु यातल्या कोणत्याही साथीपेक्षा अपघातात मरणार्यांएचे प्रमाण मोठे आहे.

वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत दाखवली जाणारी बेपर्वाई आणि वाहनांच्या संख्येत होत जाणारी प्रचंड वाढ यामुळे हे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. नांदेडसारख्या शहरातही दररोज किमान १०० तरी  नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. श्रीमंती वाढत आहे. लोकांना वाहने मिळत आहेत हे चांगलेच आहे पण या वाहनांच्या आगमनाच्या वेगाने रस्त्यांत आणि वाहतुकीबाबतच्या जागरूकतेत सुधारणा झाली नाही तर पायी जाणारांनाच काय पण वाहने चालवणारांनाही रस्त्यांवरून जाणे सुरक्षित होणार नाही. ही बाब झाली वाहनांच्या संख्येची पण प्रवास किती आणि कधी करावा याचाही काही ताळतंत्र राहिलेला नाही.

महामार्गावरून प्रवास केला तर लक्षात येते की आता लोक रात्रीचा प्रवास फार मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. वाढती स्पर्धा आणि नको तेवढे वेळेचे व्यवस्थापन यातून हा प्रकार घडत आहे. वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात याचे काही भानच राहिलेले नाही. वाहनाचा समोरचा फोकस पूर्णपणे चालू असतो आणि तो समोरील येणार्यास वाहनाच्या वाहकाच्या डोळ्यावर असतो. असे समोरून येणारे प्रकाशझोत टाळत टाळत वाहनांचे वाहक कशी काय गाडी चालवतात. हे आश्चर्यच आहे. वाहनांच्या समोरच्या दिव्यांचा वरचा अर्धा काच काळ्या रंगाने रंगवून झाकला पाहिजे असा नियम आहे. परंतु काही राज्यांमध्ये या नियमाचे कसोशीने पालन होते. बाकी पूर्ण देशभर या नियमाकडे दुर्लक्ष केलेले आढळते.

खरे म्हणजे ही गोष्ट काही अवघड नाही. परंतु आपली प्रवृत्ती वाईट आहे. मात्र अशा बेपर्वाईमुळे भारत देश हा रस्त्यावरले अपघात सर्वाधिक संख्येने करणारा देश ठरला आहे.  आपले जीवन आपल्याच बेपर्वाईने धोक्याचे होऊन बसले आहे. असुरक्षित झाले आहे. समाजात पर्यावरणा विषयी अज्ञान आहे. पाण्याविषयी जागृती नाही. तंत्रज्ञाना विषयी निरक्षरता आहे आणि आपले पैसे कोठे गुंतवावेत याविषयी अनभिज्ञता आहे. या प्रत्येक क्षेत्रात लोकांना किमान काही माहिती दिली जाण्याची गरज आहे. असे सांगताना त्या त्या क्षेत्रातली साक्षरता निर्माण केली पाहिजे असे म्हटले जाते. तशी वाहन साक्षरताही वाढण्याची गरज आहे. आता तरी आपण घराच्या बाहेर वाहन घेऊन पडतो आणि सुखरूप घरी येतो. ते आपल्या नशिबावरच येतो.  परवाना नसलेला कोण वाहन धारक आपल्या गाडीवर येऊन आदळेल आणि आपल्याला जीवाला धोका होईल याची काहीही शाश्वती राहिलेली नाही. आपले जगणे असुरक्षित झाले आहे.

Leave a Comment