तोमर मृत्यू प्रकरण: तपास गुन्हे विभागाकडे

नवी दिल्ली: सामुहिक बलात्कार प्रकरणी निदर्शने सुरू असताना बंदोबस्तावर मरण पावलेले पोलीस कर्मचारी सुभाष तोमर यांच्या मृत्युच्या कारणांचा गुंता वाढत चालल्याने या प्रकरणाचा तपास दिली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले तोमर यांचा रविवारी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू आंदोलकांच्या मारहाणीमुळे झाल्याचा आरोप करून दिल्ली पोलिसांनी ८ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र तोमर यांच्यावर आंदोलकांनी हल्ला केकेलाच नाही. आमच्यासमोर ते अचानक कोसळले आणि त्यांच्या तब्येतीत बिघाड असल्याचे लक्षात आल्याने आपणच त्यांना रुग्णालयात दाखल केले; असा दावा दोन प्रत्यक्षदर्शी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे तोमर मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

या गुंतागुंतीमुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. तोमर यांच्या छाती आणि पोटामध्ये अंतर्गत जखम असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करताना केला होता. मात्र त्यांना कुठलीही जखम झाली नसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी करीत आहेत. तोमर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment