आग्रा येथेही युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

आग्रा: दिल्लीमध्ये युवतीवर झालेल्या पाशवी बलात्कारानंतर उभ्या देशात संतापाची लाट उसळलेली असताना आणि ही युवती रुग्णालयात मृत्यूशी कडवी झुंज देत असतानाही याचा परिणाम ना असले प्रकार करणाऱ्या नराधमांवर झाला आहे; ना निर्ढावलेल्या पोलीस प्रशासनावर! दिल्लीजवळंच आग्रा येथे ख्रिसमसनिमित्त मित्रांसह फिरायला आलेल्या एका युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला आणि पोलीस हा प्रकार दाबण्याच्या प्रयत्नात आहेत.

दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या प्रकाराने देशभर संतापाची लाट उसळलेली असतानाच आग्रा येथे हा प्रकार घडला. एक युवती आपल्या ३ मित्रांसह ख्रिसमसनिमित्त आग्रा, फतेहपूर- सिक्री येथे फिरण्यासाठी आलेली असताना मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरण मिनार येथे ५-६ जणांच्या टोळक्याने त्यांना अडवून युवतीशी छेडछाड करण्यास सुरुवात केली. तिच्या मित्रांनी अटकाव करताच या टोळक्याने त्यांना मारहाण केली. या युवतीला टोळक्याने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र या युवतीने आरडाओरडा केल्यानंतर स्मारकाचे खाजगी सुरक्षा रक्षक मनोज त्यागी आणि ओम पाल काही स्थानिक नागरिकांसह त्या ठिकाणी आले. त्यांना येताना पाहून या टोळक्याने तिथून धूम ठोकली.

या घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का बसल्याने ही युवती सुरक्षा रक्षकांना काहीच सांगू शकली नाही. सुरक्षा रक्षकांनी या युवतीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या युवतीच्या पालकांना बोलावून घेतले आणि तिला पालकांकडे सुपूर्द केले.
या घटनेबाबत चौकशी केली असता फतेहपूर-सिक्री पोलीस कानावर हात ठेवत आहेत; तर स्मारकाच्या परिसरात वाट चुकल्यामुळे ती युवती घाबरून गेली आहे. तिच्याशी कोणतेही गैरवर्तन झालेले नाही; असा खुलासा स्मारकाचे सुरक्षा अधिकारी राजकेसर यादव करीत आहेत.

दरम्यान; बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणा पाठोपाठ पुरबीया एक्स्प्रेस या रेल्वेतून जयपूरहून संत कबीरनगर येथे निघालेल्या विद्यार्थिनीवर तिकीट तपासनीसाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी आरडओरडा करून इतर प्रवाशांची मदत मागितली. प्रवाशांनी या तिकिट तपासनीसाला पकडून ठेवले. या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना दूरध्वनीवरून या प्रकारची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लखनौ येथे अटक करून मुरादाबाद येथील न्यायालयात हजर केले.

Leave a Comment