यूपीत छेडछाड करणाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई

अलाहाबाद दि.२६- दिल्लीतील गँगरेप प्रकरणामुळे देशभरात महिलांवरील अत्याचार प्रकरणात गदोरोळ माजला असताना उत्तर प्रदेश सरकारने महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे जाहीर केले आहे. या कायद्यानुसार अशा प्रकारचा कोणताही गुन्हा करणाऱ्याला त्वरीत १ वर्ष तुरूंगात टाकता येते.

उत्तर प्रदेशात सध्या समाजवादी पक्षाचे सरकार असून अखिलेश यादव हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सत्तेवर आल्याबरोबरच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे जाहीर केले होते. मात्र ते सत्तेवर येऊन दहा महिने झाले आणि या काळत ४० अज्ञान मुलींवर बलात्कार होऊन त्यांना ठार मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्य शासनाने यासंबंधात कडक पावले उचलण्याचे धोरण स्वीकारले असून तरूण जोडप्याला अश्लील रिमार्क करणार्याब व त्याचा जाब विचारताच मारहाण करणार्या  इंजिनिअरींगच्या सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

महिलांना अत्याचाराविरोधात संरक्षण देण्यासाठी गेल्या महिन्यातच १०९० ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर महिन्याभरात ६१ हजार महिलांना मदत आणि पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क केला असल्याचे समजते.त्यातील १५ हजार महिलांनी फोनवरून अज्ञान व्यक्ती अश्लील भाषेतील कॉल करत असल्याचे म्हटले आहे. बरेली येथील १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तेथील न्यायालयाने संबंधित गुन्हेगाराला नुकतीच फाशी सुनावली आहे असे राज्याचे गृहसचिव एस.पी.गुप्ता यांनी सांगितले.