सचिनचा अर्धविराम

विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीवर देशभरात चर्चा सुरू असताना त्याने या चर्चेला कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नागपूर येथे झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यामध्ये तो खेळला. परंतु हा सामना होण्याच्या आधी त्याने आपली पत्नी अंजली हिला तातडीने नागपूरला बोलावून घेतले. त्यामुळे सचिन तेंडुलकर तिच्याशी विचारविनिमय करून निवृत्तीची घोषणा करतो की काय, अशा शंकांना ऊत आला होता. त्या शंका पूर्णपणे खर्याृ ठरल्या नाहीत, मात्र निम्म्या खर्या, ठरल्या आणि नागपूरचा हा अनिर्णित राहिलेला सामना संपल्यानंतर आठवडाभराने सचिनने एकदिवसीय सामन्यातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. तो इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलाही होता. परंतु तिसर्याड सामन्याच्या आधी त्याने आपली निवृत्ती जाहीर करून टाकली.

गेल्या काही दिवसात निवृत्तीच्या चर्चा सुरू असल्यामुळे सचिनची ही निवृत्ती त्याच्या चाहत्यांना किवा क्रिकेट शौकिनांना फारशी धक्कादायक वाटली नाही. परंतु त्याने ज्या पद्धतीने निवृत्ती जाहीर केली आहे ती पद्धत अनपेक्षित वाटली. भारतातल्याच पण काय जगातल्याही कोणत्याही क्रिकेट पटूने अशी एका प्रकारातून निवृत्ती जाहीर केलेली नाही.

सचिनने मात्र खेळाला पूर्णविराम देण्याच्या ऐवजी अर्धविराम दिला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना नेमकी काय आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करावी हेही कळेनासे झाले आहे. भारतीय संघाचा माजी कप्तान कपिल देव याने मात्र ही भावना व्यक्त केली. त्याच्या मते सचिनने निवृत्ती जाहीर करायला काही हरकत नाही, परंतु त्याने निवृत्ती जाहीर करून एक सामना खेळायला पाहिजे. म्हणजे सचिन आता निवृत्तीचा म्हणजे आपल्या जीवनातला शेवटचा एक दिवसीय सामना खेळत आहे हे सामना सुरू असतानाच लोकांच्या लक्षात आले असते आणि लोकांनी तो सामना एन्जॉय केला असता. करोडो लोकांनी टी.व्ही. वरून का होईना परंतु त्याचा शेवटचा सामना घरात बसून आवर्जून पाहिला असता.

मात्र ही संधी सचिनने आपल्या चाहत्यांना दिली नाही. त्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला एक चमत्कार आहे आणि ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन वगळता अन्य कोणताही क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जवळपास सुद्धा येऊ शकत नाही. ज्या लोकांना क्रिकेटमध्ये काहीच रस नव्हता असे कित्येक लोक सचिनमुळेच क्रिकेट शौकिन झालेले आहेत.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव म्हणण्याची प्रथा आहे. कारण शतकांचे शतक करणारा तो जगातला एकवेळ खेळाडू आहे. ज्या एकदिवसीय सामन्यातून तो निवृत्त झाला आहे त्या एकदिवसीय सामन्यात सुद्धा द्विशतक झळकवणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्याची इच्छा वेगवान गोलंदाज होण्याची होती. परंतु प्रशिक्षकांनी त्याची गोलंदाज म्हणून निवड न करता फलंदाजीसाठी निवड केली आणि जगाला एक आश्चर्यजनक फलंदाज बघायला मिळाला. त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने नोंदलेल्या विक्रमांची चर्चा दीर्घकाळ होत राहील, इतके विक्रम त्याने नोंदलेले आहेत.

अलीकडे अलीकडे तर त्याच्या फलंदाजीचे महत्व एवढे वाढले होते की, त्याने मारलेला प्रत्येक फटका आणि काढलेली प्रत्येक धाव कसल्या ना कसल्या विक्रमाची नोंद करत होती. वयाच्या १६ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आणि १९ वर्षाच्या आत परदेश दौर्या वर जाणारा पहिला क्रिकेटपटू इथपासून ते जगातील सर्वाधिक मैदानांवर खेळलेला एकमेव क्रिकेटपटू इथपर्यंत त्याचे अनेक विक्रम लिहिले गेलेले आहेत. मग सर्वाधिक भागीदारी, सलामीला येऊन ठोकलेली सर्वाधिक शतके, उत्तम सरासरी असे किती तरी विक्रम त्याच्या नावावर आहेत.

सचिन तेंडुलकर याची गोलंदाज होण्याची संधी हुकली असली तरी त्याने १५४ बळी घेऊन याही भूमिकेवर आपली छाप उमटवली आहे. स्लीपमध्ये उभा राहून प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या रोखणारा भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याचे नाव घेतले जाते. भारतीय संघातला तो केवळ फलंदाज नाही तर तो यशस्वी ठरलेला एक अष्टपैलू खेळाडू आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाज नाना प्रकाराने चेंडू टाकून फलंदाजांना चकवत असतात. फलंदाज हा चेंडूमुळे फसवले जाऊ नये यासाठी धडपड करत असतो. मात्र क्रिकेटच्या विश्वातला सचिन तेंडुलकर हा एकमेव असा फलंदाज आहे की, जो गोलंदाजांनाच फसवत असतो.

गोलंदाजांना गोलंदाजी करताना सचिन आपला चेंडू कसा टोलवेल याचा अंदाज घेत बसावे लागते आणि सचिन त्याच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने चेंडू टोलवून त्याचीच विकेट घेत असतो. अशा प्रकारचे कौशल्य बाळगणारा तो जगातला एकमेव फलंदाज आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला आपल्या कौशल्याचा गर्व नाही. तो माणूस म्हणून सुद्धा तेवढाच श्रेष्ठ आहे. त्याने आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत प्रसिद्धीच्या नशेत वाहत जाऊन कधीही वादग्रस्त विधान केलेले नाही. हा संयम असाधारण आहे.

Leave a Comment