नवी दिल्ली दि.२५ – जुलैमध्ये मारूतीच्या मनेसर प्रकल्पात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर ज्या ५०० कामगारांना कंपनीने काढून टाकले आहे त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात येणार नसल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी जाहीर केले आहे. कंपनीने ५०० कामगारांना बडतर्फ केले असले तरी या प्रकरणात हरियाना पोलिसांनी १५० जणांवरच गुन्हे दाखल केले आहेत. अर्थात असे असले तरी ज्यांना बडतर्फ केले आहे ते हिंसाचार आणि मारझोड करण्यात सहभागी होते याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे आमच्याकडे आहेत असे भार्गव यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे.
भार्गव म्हणाले की कामगारांनी केलेल्या दंगलीत आमचे वरीष्ठ मॅनेजर मृत्युमुखी पडले होते व १०० जण जखमी झाले होते. जे जखमी झाले त्यांनी त्यांच्यावर हल्ले करणार्यां ना ओळखले असल्याने तो प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर कंपनीने लेऑफ केला होता. सर्व तपास काळजीपूर्वक केल्यानंतरच कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला होता व त्यामुळेच त्यांना परत कामावर घेतले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
मारूती उद्योग कामगार युनियनने मात्र ज्या कामगारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यांचा निकाल न्यायालयात लागेल तो मान्य करू असे सांगितले असून ज्याच्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीत पण कंपनीने बडतर्फ केले आहे, त्यांना कामावर पुन्हा घेतले पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यासंबंधात त्यांनी कंपनीचे अध्यक्ष सुझुकी यांचीही भेट घेऊन आपले म्हणणे त्यांना सांगितले आहे. अर्थात व्यवस्थापनाने त्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन कामगार संघटनेला दिलेले नाही असेही समजते.