विक्रमादित्य अर्धनिवृत्त

एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय सामन्यांना रामराम ठोकला आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरूच होती आणि त्याचे वय झाल्यामुळे निवृत्त व्हावे असा सल्ला त्याला अनेकजण देत होते. सचिनचे आता वय झाले आहे, तो सारखे शतक झळकवत नाही, त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे, खांदा दुखावल्यामुळे त्याला गोलंदाजी करता येत नाही, त्याच्या खेळात आता राम राहिलेला नाही त्यामुळे त्याने आता निवृत्त झाले पाहिजे असा सल्ला देणे सोपे आहे. परंतु वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून ज्या सचिनची नाळ  क्रिकेट या एकाच खेळाशी जुळलेली आहे. त्या सचिनला ती नाळ तोडणे किती अवघड जात असेल याचा अंदाज असे अनाहूत सल्ले देणार्यां ना येत नाही. कारण ते गंमत म्हणून क्रिकेटची मॅच बघत असतात. परंतु ज्याचा प्रत्येक क्षण क्रिकेटलाच वाहिलेला आहे तो क्रिकेट खेळाडू लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी देदिप्यमान आणि  ते कौशल्य अवगत होण्यासाठी ज्यांनी प्राण प्रणाने मेहनत केलेली असते, त्या खेळाडूसाठी निवृत्ती ही काय असते हे या लोकांना कळत नाही.

अर्थात त्यांना ती कळो की न कळो क्रिकेट खेळणार्याल प्रत्येक खेळाडूला साधारण चाळीशी  जवळ आली की निवृत्त व्हावेच लागते. सचिनच्या बाबतीत ते खरे आहे मात्र क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि क्रिकेटकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहणारे समीक्षक निवृत्त करायला तयार नव्हते. त्यामुळे सचिनच्या निवृत्तीवरून चलबिचल चाललेली होती. अशा अवस्थेत सचिनने शेवटी  अंशतः निवृत्ती स्वीकारली आहे. १९८९ साली प्रथम पाकिस्तानच्या विरूध्द खेळताना सचिनने पाकिस्तानच्या मैदानावर मुलूख मैदानी तोफा म्हणवल्या जाणार्याक पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला आणि वयाची विशी गाठण्याच्या आतच सार्याा जगाचे लक्ष वेधून घेतले.

सचिनला वेगवान गोलंदाज व्हायचे होत परंतु चेन्नईच्या एमआरएफ पेस अकादमी मध्ये प्रशिक्षक डेनिस लिली यांनी त्याची गोलंदाजी अमान्य केली. खरे म्हणजे क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याचे एक शास्त्र असते, ठरलेले तंत्र असते. सचिनची फलंदाजी त्याही शास्त्राला उतरत नव्हती. परंतु त्याची फलंदाजी मान्य झाली. गोलंदाजी काही मान्य झाली नाही. सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला त्यातल्या २७० सामन्यांमध्ये १३४० षटके टाकली आणि १५४ विकेट घेतल्या आणि आपण गोलंदाज म्हणूनसुध्दा कसे काबील आहोत हे दाखूवन दिले. क्षेत्ररक्षणातसुध्दा त्याने स्लीपमधला भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून नाव मिळवले.

सचिन हा फलंदाज म्हणून ख्यातनाम झाला असला तरी गोलदांजीच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे हे त्याच्या बाबतीत अन्यायकारक ठरणार आहे. सचिन तेंडुलकर मुळात कसोटी खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि त्याचे पहिले काही विक्रम कसोटीतलेच आहेत. याच काळामध्ये एकदिवसीय सामन्यांचे नगारे वाजायला लागले होते. एकदिवसीय सामना म्हणजे खालच्या दर्जाचा खेळ आणि कसोटी सामना शास्त्रशुध्द क्रिकेट अशी चर्चा त्या काळात सुरू होती. मात्र कोणत्याही खेळामध्ये नवे तंत्र जन्माला येते तेव्हा अशी चर्चा होतच असते. जुन्या तंत्राने खेळणारे खेळाडू नव्या तंत्रात बसतात की नाही अशी शंका असते.

अशा चर्चांना शह देऊन सचिन तेंडुलकर कसोटी इतकाच एकदिवसीय सामन्यांतसुध्दा चमकला. एवढेच नव्हे तर याही सामन्यांत तो विक्रमादित्य ठरला.  तो ४६३ सामने खेळला. त्याच्या एकदिवसीय सामन्यांतल्या १८४२६ आहेत. त्यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतके आहेत. ४६३ सामन्यांपैकी ६२ सामन्यांमध्ये सामनावीर ठरला तर १५ मालिकांमध्ये त्याला मालिकावीर हा मान मिळाला. कसोटीप्रमाणेच एकदिवसीय सामन्यांत सुध्दा सचिनचा प्रत्येक फटका हा नवा विक्रम नोंदणारा ठरायला लागला. पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणारा हा क्रिकेटचा परमेश्वर आतापासून एकदिवसीय सामन्यांत खेळणार नाही आणि त्याचा शैलीदार खेळ त्याच्या चाहत्यांना या प्रकारच्या सामन्यांत तरी पहायला मिळणार नाही.

त्याची निवृत्ती एकप्रकारे अपेक्षितच आहे. परंतु निवृत्तीची पध्दत मात्र अनपेक्षित आहे. तो अशी अशंतः निवृत्ती जाहीर करेल असे कोणालाच वाटले नव्हते. त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेट रसिकांना तो एकेदिवशी निवृत्त होणार हे माहीतच होते परंतु तो अशा प्रकारे निवृत्त होईल याची कल्पना नसल्यामुळे मोठी चुटपुट लागून राहिली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव याने असे म्हटले आहे की सचिनने आपण आता निवृत्त होणार आहोत परंतु निवृत्तीपूर्वीची शेवटची मॅच उद्या खेळणार आहोत असे जाहीर करायला हवे होते. म्हणजे लोकांनी त्याची ती शेवटची मॅच डोळाभरून पाहिली असती. परंतु त्याने निवृत्ती आधी खेळलेली मॅच शेवटची मॅच होती हे लोकांना माहीत झाले नाही. एकदिवसीय सामन्यांत सचिनने जशी ही निवृत्ती जाहीर केली तशी त्याने कसोटीतून निवृत्ती जाहीर करू नये एवढीच अपेक्षा.

Leave a Comment