एकदिवसीय क्रिकेटमधून सचिन निवृत्त

मुंबई: विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकर याने अखेर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. मागील काही काळापासून धावा होत नसल्याने त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव होता. यापुढे कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सचिनने नमूद केले आहे.

सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले. भारतीय क्रिकेट संघाला सन २०१५ चा विश्वचषक जिंकण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे आवश्यक असल्याची जाणीव सचिनने निवृत्ती जाहीर करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलेल्या पत्रात करून दिली. विश्वचषक विजेत्या संघाचा एक घटक असल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो; असेही सचिनने पत्रात नमूद केले आहे.

सचिनने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत ४६३ सामने खेळले असून १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने गोलंदाजी करून १५४ बळीही घेतले आहेत.

सचिनच्या निवृत्तीने एकदिवसीय क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. क्रिकेटमधील आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला आपल्या घरी बोलावून त्याचा सन्मान केला होता. भारताच्याच नव्हे; तर जगभरातील नामांकित फलंदाजांसाठी सचिन आदरणीय राहिला आहे.

Leave a Comment