हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी वीरभद्र सिंह

सिमला: हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी वीरभद्र सिंह यांची निवड करण्यात आल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी केली. वीरभद्र सिंह यापूर्वी ५ वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते.

राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक येथे पार पडली. या बैठकीत वीरभद्र सिंह यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. सिंह दि. २५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करतील.

वीरभद्र सिंह यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचा त्याग करावा लागला. मात्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सिंह यांच्याच खांद्यावर ठेवली. या निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण बहुमत प्राप्त करून हिमाचल प्रदेशाची सत्ता भारतीय जनता पक्षाकडून हिसकावून घेतली.

Leave a Comment