बद्रीनारायण- पाच प्रयागांचे दर्शन घडविणारा मार्ग

हिमालयातील चार धाम यात्रेतील महत्त्वाचे आणि अतिसुंदर क्षेत्र म्हणजे बद्रीनारायण. पाच प्रयागांचे दर्शन घडविणारी बद्रीची वाट एकदा तुडवायला हवी अशीच. प्रयाग म्हणजे नद्यांचे संगम. हृषिकेशपासून ३०० किमीवर असलेले हे स्थान. रस्त्यात प्रथम लागतो तो अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम असलेला रूद्रप्रयाग. त्यानंतर येतो देखणा कर्णप्रयाग म्हणजे पिंडार आणि अलकनंदा नदीचा संगम. याच्या काठावर आहे उमामंदिर. कर्णाने या ठिकाणीच सूर्याची तपश्चर्या केली होती असे सांगतात. त्यानंतर लागतो नंदप्रयाग. हे अगदी छोटे ठिकाण असून येथेही अलकनंदेचा मंदाकिनी नदीशी संगम होतो. ब्रदीवाटेवरचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे जोशीमठ. हा मुळचा ज्योर्तिमठ. त्याचा अपभ्रंश जोशीमठ.
Himalaya
जोशी मठ येथे आद्य शंकराचार्यांचा मठ आहे आणि अतिप्राचीन कल्पवृक्षही येथे पाहायला मिळतो. नृसिंहाचे मंदिरही पाहायला हवे असेच. बर्फवृष्टी सुरू झाली की बद्रीनारायणाची पूजा याच ठिकाणी केली जाते. जोशीमठापासून १० किमीवर विष्णूप्रयाग असून ही अरूंद खिंडच आहे. येथे अलकनंदा आणि धौली नदीचा संगम होतो. त्यानंतर लागतो गोविंदघाट. येथे शिख धर्मगुरू गोविंदसिंह याचे स्थान असून हेमकुंड हे शीखांचे धार्मिक स्थळ आहे. येथूनच व्हॅली ऑफ फ्लॉवर्ससाठीचा रस्ता जातो. गोविंदघाट ते पांडुकेश्वर हा चार किमीचा रस्ता असून हे योगध्यान बद्रीचे स्थान आहे. पंडू राजाची अखेर येथेच झाली असे सांगितले जाते.
Himalaya3
त्यानंतर लागते ती हनुमानचट्टी. येथेच मारूती रायाने म्हातार्याड वानराचे रूप घेऊन भीमाच्या शक्तीचे गर्वहरण केले होते अशी कथा आहे.. त्यानंतर ९ किमीचा चढणीचा सुंदर रस्ता असून रानगुलाबांचा सुगंध दरवळत असतो. आणि यानंतर येते बद्रीनारायणाचे स्थान. हिमालय हे शंकराचे स्थान. त्यात हे एकमेव विष्णूस्थान आहे. कथा अशी सांगतात की शिवपार्वतीच्या घराबाहेर एक बालक रडत होते त्याला पार्वतीने पोटाशी धरले.घरात घेतले आणि नंतर शिवपार्वती स्नानाला गेले. परत येतात त या बालकाने घराचे दार उघडले नाही आणि या स्थानावर कब्जा केला. कारण विष्णूच हे बालक रूप घेऊन आले होते.
Himalaya1
अलकनंदा नदीच्या काठावर सुंदर विष्णूमंदिर आहे. येथे गरम पाण्याची कुंडेही आहेत. पायर्या  असलेल्या उंच चौथर्यामवर मुख्य मंदिर आहे. महाद्वार म्हणजे सिंहद्वारावर दशावतार कोरलेले असून मंदिराचे आवार अत्यंत प्रशस्त आहे. गरूड, लक्ष्मी, गण, घंटाकर्ण यांची देवळे आवारात आहेत. मंदिरात आत गेल्यावर डाव्या हाताला समर्थ रामदास स्वामींनी स्थापलेला वीर मारूती आहे. मंदिराचे शिखर पॅगोडा पद्धतीचे आहे. मंदिर गाभारा अंधारा असल्याने मूर्ती नीट दिसत नाही. मात्र काळ्या पाषाणातील चतुर्भूज मूर्ती पद्मासनस्थित आहे. उजवीकडे श्रीलक्ष्मी व पलिकडे नरनारायण मूर्ती आहेत. कुबेर व गणपतीच्याही मूर्ती आहेत.
Himalaya2
मंदिरात अक्षय नंदादीप आहे. असेही सांगितले जाते की बद्रीची प्राचीन मूर्ती परिसापासून बनविली गेलेली आहे. परिस म्हणजे लोखंडाचे सोने करणारा दगड. येथे जवळच असलेल्या पितृतीर्थावर पिंडश्राध्द विधी केले जातात. बद्रीपासून पाच किमी असलेल्या मानाची भेट चुकवू नये अशी. अलकनंदेच्या डाव्या काठावर असलेले हे ठिकाण इंडोचीन सीमेवरचे भारतातले शेवटचे ठिकाण आहे. एकावर एक पापुद्रे असलेले प्रचंड खडक आणि त्यात असलेल्या गुहा. एक व्यासांची त्याखाली गणपतीची. येथेच व्यासांनी गणपतीला महाभारत सांगितले आणि गणेशाने ते लिहिले असा समज आहे. जवळच सरस्वती नदीचा प्रचंड वेगाने कोसळणारा आणि उरात धडकी भरावी असा छोटेखानी वेगाने कोसळणारा प्रवाहही आहे. त्यावर आहे भीमशीळा. पांडवांना स्वर्गारोहणासाठी जावयाचे होते तेव्हा सरस्वतीला पाय लावून कसे जायचे म्हणून भीमाने ही शीला नदीच्या प्रवाहावर टाकली असे सांगतात. महाभारताची पोथी म्हणून एक खडक दाखवितात. तो खराच पुस्तकासारखा दिसतो हे मात्र खरे. तेव्हा बद्रीनारायणाच्या यात्रेला जायचे ना!

Leave a Comment