जवानांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी डीआरडीओचे संशोधन

नवी दिल्ली: सियाचीनसारख्या बर्फाळ प्रदेशात जवानांचे मनोधैर्य कायम राहावे यासाठी विशिष्ट प्रकारचे बंकर्स सुरक्षा संशोधन आणि विकास संघटनेने विकसित केले आहेत. या बंकर्समध्ये बर्फात राहणाऱ्या जवानांनाही समुद्राकाठचे हवामान, जंगले आणि पक्ष्यांची किलबिल अनुभवायला मिळणार आहे. प्रोजेक्ट ध्रुव अंतर्गत विकसित करण्यात आलेले हे बंकर्स लवकरंच बर्फाळ प्रदेशात बसविण्यात येणार आहेत.

डीआरडीओ मुख्य नियंत्रक डब्ल्यू.सेल्वामूर्ती यांनी या बण्कर्सबाबत पत्रकारांना माहिती दिली. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या या बंकर्समध्ये अत्यंत प्रतिकूल वातावरणातही जवानांना तणावमुक्त राहता येईल; असा विश्वास सेल्वामूर्ती यांनी व्यक्त केला. प्रतिकूल वातावरणामुळे जवानांच्या मनावर अतिरिक्त तणाव निर्माण होऊन आत्महत्या अथवा सहयोगी जवानांच्या हत्यांचे प्रमाण वाढल्याने डीआरडीओने १ वर्षापूर्वी प्रोजेक्ट ध्रुव हाती घेतला. या योजनेअंतर्गत संशोधन करून हे बंकर्स विकसित करण्यात आले आहेत.

प्रोजेक्ट ध्रुवच्या पुढच्या टप्प्यात खोल समुद्रात दीर्घकाळ वास्तव्य करून नौसैनिकांना होणारा एकाकीपणाचा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने संशोधन केले जाणार आहे; असेही सेल्वामूर्ती यांनी सांगितले.

Leave a Comment