स्वतःलाच विकले लॉटरीचे तिकिट, जिंकले आठ कोटी!

अमेरिकेत एका लॉटरी दुकानदाराने एक तिकिट स्वतःसाठी काढून घेतले. त्याने जे तिकिट स्वतःसाठी काढले, त्यालाच लॉटरी लागल्याने आता तो आठ कोटींचा मालक झाला आहे. जेव्हा त्याला आपल्याच तिकिटाला लॉटरी लागल्याचे कळले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. हे तिकिट विकल्याबद्दल त्याला १० हजार डॉलरचे कमिशनही मिळणार आहे. पश्चिम पेनिसिल्वेनियामध्ये रॉन रिया या व्यक्तीचे टॅबाकू वर्ल्ड शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानात लॉटरीची तिकिटेही तो विकायला ठेवतो.

लॉटरीची तिकिटे विकताना एकदा आपणही तिकिट विकत घेऊन पाहावे, असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने एक तिकिट स्वतःसाठी काढून घेतले. निकालाची वाट पाहत असताना निकाल हाती आला तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. कारण चक्क त्याच्याच तिकिटाला लॉटरी लागली होती. आयुष्यात कधीही लॉटरी न खेळलेल्या रॉनला पहिल्याच प्रयत्नात लॉटरीचे तिकिट लागल्याने तो नशिबवान ठरला आहे.

लॉटरी लागल्याबद्दल रॉन म्हणाला, की अनपेक्षितपणे म्हातारपणात देवाने आम्हाला चांगलेच उपकृत केले असून, या पैशांनी आमचे म्हातारपण कुणाच्याही मदतीविना आम्हाला काढता येणार आहे. लॉटरीचे तिकिट ज्या दुकानातून विकले जाते, त्या दुकानदाराला एखाद्या तिकिटाला अशी भरघोस रक्कम लागल्याबद्दल कमिशन दिले जाते. ते १० हजार डॉलरचे कमिशनही रॉनला मिळणार आहे. त्यामुळे म्हातारपणात त्याची चांगलीच चांदी झाली आहे.