वैद्यकीय सेवेतील नंदादीप

डॉ. श्वाइट्झर नावाचा एक पाश्चात्य डॉक्टर आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा लाभ मागासलेल्या लोकांना झाला पाहिजे या जिद्दीने आफ्रिकेत गेला आणि तिथे त्याने जन्मभर आफ्रिकन लोकांची सेवा केली. वैद्यकीय क्षेत्रातील सेवा कार्याचे ते फार मोठे प्रेरक उदाहरण होते. सोलापूरचे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनीही चीनमध्ये जाऊन तिथल्या रूग्णांची एवढी सेवा केली की चीनमधले लोक त्यांना देव मानायला लागले. चीनमध्ये सर्वात लोकप्रिय दहा व्यक्तींची यादी केली असता त्यात डॉ.कोटणीस यांचा समावेश केलेला आढळला. ही अशी उदारहरणे ऐकताना लातूरचे डॉ.अशोकराव कुकडे यांची मूर्ती सतत डोळ्यासमोर येते.

१९६४ साली ते आपले शिक्षण पूर्ण करून पुण्याहून लातूरला आले. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग मराठवाड्यातल्या लोकांना झाला पाहिजे हा त्यांचा पुण्यातून लातूरला येण्यामागचा दृष्टिकोन होता. त्यांनी पुण्यामध्ये प्रॅक्टिस केली असती तर  ते करोडपती झाले असते. कारण शस्त्रक्रिया करण्याच्याबाबतीत त्यांचा हात धरू शकतील असे फार कमी डॉक्टर्स महाराष्ट्रात असतील. असे डॉक्टर पुण्यात किवा मुंबईत असले की त्यांच्यावर प्रकाशझोत पडतो. मग ते सुप्रसिध्द डॉक्टर होतात. लातूरमध्ये राहणार्याअ डॉ.कुकडे यांच्यासारख्या निष्णात शल्यचिकित्सकाच्या हातात कितीही कौशल्य असले तरी त्यांच्यावर असे प्रकाशझोत पडत नाहीत. कारण ते लातूरमध्ये रहात असतात.

प्रकाशझोत पडले नसले तरीही डॉ. कुकडे यांच्या शल्यकर्म कौशल्याविषयी मोठ्या शहरातल्या डॉक्टरांनासुध्दा आदर आहे. मात्र आपले हे कौशल्य पुण्यात राहून भरपूर पैसा कमविण्यासाठी खर्च करण्यापेक्षा ज्या लोकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही त्यांच्यासाठी वापरावे असे डॉक्टरांना वाटले आणि त्यांनी लातूरची निवड केली. लातूरमध्ये त्यांना येऊन आता जवळपास ५० वर्षे होत आहेत. त्यांनी डॉ. आलूरकर, भराडिया यांच्यासह ही पाच दशके अविरत वैद्यकीय सेवा बजावली आहे. या ५० वर्षामध्ये त्यांनी जे कमावले ते विवेकानंद वैद्यकीय ट्रस्टला दिलेले आहे. म्हणजे त्यांनी आपल्या कौशल्यातून मिळालेला पैसा स्वतःसाठी वापरला नाही आणि त्यातून मोठी मालमत्ताही कमावलेली नाही. परंतु ती सारी मिळकत एका ट्रस्टला अर्पण केली आहे.

वर उल्लेख केलेल्या दोन डॉक्टरांची नावे घेतल्यानंतर डॉ. कुकडे यांचे नाव डोळ्यासमोर येते ते यामुळेच होय. त्यांनी जेव्हा सुरूवातीला विवेकानंद हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यांच्याकडे लोक संशयाच्या  नजरेनेच बघत होते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि वैद्यकीय व्यवसाय हा त्यांचा केवळ बहाणा आहे. या माध्यमातून त्यांना संघाचा प्रचार करायचा आहे असे लोक बोलत असत. त्या दृष्टीने अनेक लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचीसुध्दा चर्चा सुरू केलेली होती. परंतु कोणतेही चांगले काम करताना अशा प्रकारचा संशय, लोकांची टीका आणि अनेकदा विरोधसुध्दा होत असतो. मात्र काम करणार्यारची आपल्या कामावर श्रध्दा असेल आणि आपला हेतू स्वच्छ आहे अशी त्याची खात्री असेल तर तो माणूस अशा विरोधाची, टीकेची आणि संशयाने बघणार्यात नजरांची पर्वा करत नाही. त्याच्या कामातूनच हे संशय हळूहळू आपोआपच कमी व्हायला लागतात.

अर्थात डॉक्टर हे संघाचे स्वयंसेवक आहेत आणि आपले जीवन आणि कौशल्य असे समाजासाठी अर्पण केले पाहिजे ही प्रेरणा त्यांना संघातूनच मिळालेली आहे आणि त्यांनी आपले संघाचे स्वयंसेवकत्व, वैद्यकीय व्यवसाय चालावा म्हणून लपवून ठेवलेले नाही आणि मुळात त्यांनी संघाचा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यात गैरही काही नाही. परंतु डॉ. कुकडे यांचा स्वभाव असा आहे की ते फार चर्चा करत बसत नाहीत. आक्षेपांना उत्तरेही देत बसत नाहीत. लोक अनेक प्रकारे बोलत राहतात परंतु त्यांचे खुलासे ते करत नाहीत. शेवटी त्यांचे काम, त्यांची निष्ठा आणि त्यांचे त्यांच्या कामाप्रती असलेले समर्पण यातून आपोआपच सारे खुलासे होत राहतात अशी त्यांना खात्री आहे.

आपल्यावर होणार्यास टीकेला ताबडतोब उत्तर दिले पाहिजे अशी तातडी वाटणे हा एक उतावळेपणाच असतो आणि टीका धीरगंभीरपणे सहन करून आपोआप तिला उत्तर मिळेल असे काम करीत राहण्यात एक परिपक्वपणा असतो. ती परिपक्वता आणि स्वभावातले गांभीर्य यामुळे डॉ. कुकडे आज लातूर शहरामध्येच नव्हे तर आसपासच्या भागामध्ये सुध्दा समाजातल्या सर्व वर्गांच्या लोकांच्या आदराचे स्थान बनले आहेत. संघाचा विचार न मानणारे आणि डॉक्टरांवर सुरूवातीला टीका करणारे असे कितीतरी लोक आहेत की जे नंतर डॉक्टरांचे चाहते बनलेले आहेत. लातूर जिल्हयाला लगत असलेल्या कर्नाटकाच्या आणि आंध्राच्या भागातून कितीतरी रूग्ण केवळ डॉ. कुकडे यांच्या हातून इलाज करून घेण्यासाठी म्हणून लातूरला येत असतात. त्यांची सेवा करीत करीत डॉ. कुकडे यांनी  लातूर शहरात विवेकानंद रूग्णाच्या रूपाने जे भव्य  वैद्यकीय सेवेचे दालन उभे केले ते अभूतपूर्व आहे. डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment