स्पेक्ट्रम घोटाळा- एअरटेल, व्होडाफोनवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली: मोबाईल सेवा देणारी देशातील आघाडीची कंपनी भारती एअरटेल, व्होडाफोनच्या दोन उपकंपन्या आणि दूरसंचार विभागाचे माजी सचिव यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने टेलिकॉम घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या घोटाळ्यामुळे देशाचे तब्बल ८४६कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा दावा आहे.

भारती एअरटेल, व्होडाफोनच्या कंपन्या हचिसन मेक्स, स्टर्लिंग सेल्युलर आणि दूरसंचार विभागाचे माजी सचिव श्यामल घोष यांच्यावर सीबीआयने गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. घोष यांच्यावर आपल्या पदाचा दुरुपयोग करून मर्जीतील कंपन्यांना अधिक स्पेक्ट्रम मिळवून देण्याबद्दल आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या कार्यकालातील २-जी स्पेक्ट्रम घोटाळा सन २००८ मध्ये उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्याच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे नियंत्रण आहे. सीबीआयला सन २००१ पासून २००७ पर्यंत कोणत्याही दूरसंचार व्यवहारात गैरव्यवहार अथवा अनियमितता आढळल्यास त्याचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

शुक्रवारी गुन्हे दाखल झालेले हे प्रकरण सन २००२ मधील आहे. या काळात केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते. प्रमोद महाजन त्यावेळी दूरसंचार मंत्री होते.

Leave a Comment