संजयाच्या निरुपम टीपण्णीवरून नवा वाद

मुंबई: काँग्रेस प्रवक्ते संजय निरुपम यांनी ज्येष्ठ अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृति इराणी यांच्यावर केलेल्या टिपण्णीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. निरुपम यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी; अशी मागणी भारतीय जनता पक्षाने थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेच केली आहे.

एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील निवडणूक विश्लेषण कार्यक्रमात निरुपम यांनी इराणी यांना उद्देशून; ‘तुम्ही तर एकेकाळी टीव्ही मालिकातून ठुमके लावत होतात आणि आता राजकीय विश्लेषक बनला आहात;’ असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे; तर कला, सामाजिक क्षेत्र आणि सामान्य स्तरावरील महिलांकडूनही निषेध होत आहे.

निरुपम यांच्यावर; ‘तुम्ही देखील एकेकाळी पैसे मिळविण्यासाठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात आला होतात आणि वाईट वर्तणुकीमुळे तुम्हाला एका आठवड्यात त्यातून बाहेर काढले’; अशी कडवट टीका अभिनेत्री पायल रोहतगी हिने ट्विटरवरून केली आहे. निरुपम यांची ही मल्लिनाथी काँग्रेसची संस्कृती स्पष्ट करणारी आहे; अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निरुपम यांच्याबरोबर काँग्रेसवरही निशाणा साधला. ‘निरुपम यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत. या बोलण्यामुळे देशातील राजकारण्यांची पातळी किती ढासळलेली आहे हेच दिसून येते; अशा भावना विख्यात लेखिका मधू किश्वर यांनी व्यक्त केल्या.

विख्यात साहित्यिक, चित्रपट निर्माता प्रीतीश नंदी यांनी या निमित्ताने केवळ निरुपम यांनाच नव्हे; तर वृत्तवाहिन्यांनाच लक्ष्य केले. ‘आपल्या वृत्तवाहिन्यांची खुबॆच ही आहे; की त्यात चर्चेच्या मुद्द्यांपेक्षा सहभागी वक्त्यांचीच अधिक माहिती कळते;’ असे त्यांनी ट्विट केले आहे.

Leave a Comment