राजकीय पक्ष देतात बलात्कार्‍यांना संरक्षण: जगदीप छोकर

नवी दिल्ली: राजधानीत घडलेल्या सामुहिक बलात्काराबाबत सर्वपक्षीय राजकारण्यांच्या भावना म्हणजे नक्राश्रू असून राजकीय पक्षच बलात्कारासारखे आरोप असलेल्यांना निवडणुकीची तिकीटे देऊन पाठीशी घालत आहेत; असा आरोप ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ या संस्थेचे संस्थापक जगदीप छोकर यांनी केला.

संस्थेने दिल्ली राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष छोकर यांनी जाहीर केले.
विविध राजकीय पक्षांनी मागील ५ वर्षात राज्य स्तरावर झालेल्या विविध निवडणुकीत राजकीय पक्षांनी बलात्काराचा आरोप असलेल्या किमान २० जणांना तिकीट दिल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. या शिवाय लैंगिक छळासारखे अन्य महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्या २६० जणांनी विविध राजकीय पक्षांच्या तिकीटावर निवडणुका लढविल्या आहेत; असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे बलात्कार अणि महिलांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्यांना उमेदवारी देऊन राज्यकर्ते बनायला मदत करायची; हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप करून छोकर म्हणले की; यापुढे तरी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्याचे टाळायला हवे. ज्या लोकप्रतिनिधींवर बलात्कारासारखे गुन्हे दाखल असतील त्यांना ताबडतोब पदावरून दूर करावे; अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

Leave a Comment