गुजरातच्या निकालाचा अर्थ

गुजरात विधानसभेची  निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीतल्या भाजपाच्या विजयाचा अर्थ नेमका काय आहे याची चर्चा सुरू  झाली. विजयाच्या क्षणी लोक नीट आत्मपरीक्षण करीत नाहीत. पराभवात मात्र लोक आत्मपरीक्षण करतात. पराभवाच्या क्षणाचे आत्मपरीक्षण चांगले असते कारण अशा वेळी आत्मपरीक्षण आवश्यक आहे असे वाटत असते. पण विजयाच्या क्षणी आत्मपरीक्षण करायचे असते हेच कोणी मानत नाहीत म्हणून आत्मपरीक्षण होतही नाही आणि झालेच तर ते आत्मस्तुतीने तसेच पर्यायाने आत्मवंचनेने भरलेले असते.

आता भाजपाचे नेते गुजरातेतल्या विजयाचे ढोल बडवत आहेत आणि त्यांना देशात भगवी  लाट येत असल्याचे भास व्हायला लागले आहेत. त्यांची त्यात काही चूक आहे याची त्यांना जाणीवही नाही कारण ते याच काळात झालेल्या हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीतला पराभव पूर्णपणे विसरून गुजरातेतल्या विजयाचे झेंडे नाचवायला लागले आहेत. दुसर्या  बाजूला काँग्रेसचे नेते याच प्रकाराची कॉपी करायला लागले आहेत. त्यांच्या मते त्यांचा या निवडणुकीत विजय झालेला आहे. त्यांना या निवडणुकीत काहीच गमवायचे नव्हते. कारण, दोन्ही राज्यांत भाजपाचे सत्ता होती. त्यातल्या एका राज्यातली सत्ता आपण भाजपाकडून खेचून घेतली याचा त्यांना आनंद होत आहे.

पण त्यांना या विजयाचा  उन्माद विसरावा लागणार आहे. कारण त्यांना गुजरातेत नरेंद्र मोदी यांचा घोडा अडवण्यात यश आलेले नाही. तिथे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले तीन नेते भाजपाचा त्याग करून मोदी यांच्या विरोधात उभे असताना काँग्रेसला तिथला आपला नेतृत्वाचा अभाव का दूर करता येत नाही याचा विचार करावा लागणार आहे. भाजपाला तिथे सलग पाच वेळा यश मिळाले आहे याचा अर्थ काय होतो ? आपल्या तिथल्या जागा ५९ होत्या त्या आता ६२ वर गेल्या याचा त्यांना आनंद झाला आहे पण या वेगाने ते प्रगती करीत असतील तर त्यांना गुजरातेतली आपली हातून गेलेली सत्ता प्राप्त करायला किती दशके लागतील याचा त्यांनी विचार केला पाहिजे. दारुण पराभव झाला असूनही तो आपला विजयच आहे असे आकड्यांच्या फेकाफेकीतून दाखवून आपल्या कार्यकर्त्यांचे सांत्वन आणि जनतेची दिशाभूल करता येईल पण त्यामुळे आपणच आपल्या डोळ्यात धूळ फेकत आहात हे आपल्या लक्षात कधी येणार आहे की नाही ?

ही गोष्ट दोन्ही पक्षांसाठी आहे. विधानसभा निवडणुकीच्या या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची दोन राज्यात परीक्षा होती. या दोन्ही निवडणुकांच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीचे मुद्दे ठरलेले होते. सध्या काँग्रेस पक्षाविषयी जनतेत प्रचंड असंतोष आहे, जनता महागाईला कंटाळलेली आहे, मनमोहनसिग यांचे सरकार आणि त्यांचा काँग्रेस पक्ष जनतेच्या मनातून उतरलेला आहे, त्यामुळे काँग्रेसचा पराभव अटळ आहे असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे होते. लोकांना आता काँग्रेस नको आहे तर भारतीय जनता पार्टी हवी आहे. असा भाजपा नेत्यांचा दावा होता. पण तो खोटा ठरला आहे.

तो खरा असता तर हिमाचल प्रदेशात भाजपाचा पराभव झालाच नसता. लोकांच्या मनात काँग्रेसविषयी तिडिक निर्माण झालेली असेल तर हिमाचल प्रदेशाच्या मतदारांनी तिथे काँग्रेसला झिडकारायला हवे होते.  भ्रष्टाचारामुळे लोक काँग्रेसवर चिडले असतील तर या मुद्यावरून तर हिमाचल प्रदेशात काँग्रेस भुईसपाट व्हायला हवी होती. कारण तिथे काँग्रेसने वीरभ्रदसिह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेली होती आणि याच वीरभ्रदसिह यांना केवळ तीनच महिन्यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत जनता त्यांच्या मागे उभी रहायला नको होती परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तिथे भाजपाची सत्ता हिसकावून घेतली आहे.

तिथल्या भाजपाच्या सरकारवर सुध्दा भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि ते दुसरे तिसरे कोणी केलेले नसून खुद्द भाजपाच्या खासदारांनीच केले आहे. भाजपाचे खासदार महेश्वरसिंह यांनी पक्षाच्या बाहेर पडून हिमाचल लोकहित पार्टी हा पक्ष स्थापन केला होता आणि ३८ मतदार संघात आपले उमेदवार उभे केले होते. मुख्यमंत्री प्रेमकुमार धुम्मल यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी अशी मागणी महेश्वरसिह यांनी भाजपा श्रेष्ठींकडे सातत्याने केली होती. पण ती मान्य न झाल्यामुळे ते बाहेर पडले. तिथे भाजपाचीही भ्रष्ट अशीच प्रतिमा आहे.

गुजरातमधला भाजपाचा विजय हा नेतृत्वाचा विजय आहे. नरेंद्र मोदी यांनी तिथे भाजपाला जोरदार नेतृत्व दिलेले आहे. या नेतृत्वाच्या यशाचे नेमके गमक  काय आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. मोदी यांनी सलग तीन निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्यामागे हिंदुत्वाचा अजेंडा आहे. असा आरोप भाजपाचे सारे विरोधक करत असतात. पण एवढ्याच एका मुद्यावर ते निवडून आले आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. आणखी शोध घ्यावा लागेल.

Leave a Comment