कलमाडी आणि अन्य दहा जणांवर आरोपपत्र

नवी दिल्ली दि.२१ – दिल्लीत पार पडलेल्या २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कंत्राटे देताना सुमारे ९० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश कलमाडी व अन्य दहा जणांवर आज दिल्ली न्यायालयात सीबीआय आरोपपत्र दाखल केले.

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेच्या काळात विशिष्ट कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून भ्रष्टचार केल्याबाबत कलमाडी, संघटनेचे महासचिव ललित भानोत व अन्य ९ जणांवरही आरोपपत्र दाखल केले असून भारतीय दंड विधानाच्या कलम १२० बी, फसवणूकीसाठी ४२०, बनावट दस्तावेज बनविण्यासाठी कलम ४७१ व ४६८ व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा याखाली ही आरोपपत्रे दाखल केली गेली.

कलमाडी यांनी यापूर्वीच आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून आपल्याला नेमून दिलेले कामच आपण केले आहे असे न्यायालयात सांगितले आहे. ज्या स्वीस कंपनीला व स्वीस फर्मला निविदा प्रकीया डावलून कंत्राटे देण्यात आली त्या स्वीस टाईम, ओमेगा या कंपन्यांनाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे असे सीबीआयच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment