राजधानीतला आतंक

भारतात स्त्री च्या बाबतीत इतकी सुभाषिते सांगितली जातात की त्यांचा संग्रह केल्यास एक मोठा ग्रंथ तयार होईल. स्त्री चा शाब्दिक सन्मान करण्याच्या बाबतीत आपला हात जगात कोणी धरू शकणार नाही. पण हा सन्मान केवळ शाब्दिकच. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र स्त्रीची मानहानी आणि मानखंडणा करण्यातही आपला हात या जगात कोणी धरणार नाही. इतकी आपली स्त्रीयांना दिली जाणारी वागणूक वाईट आहे. आता स्त्री समाजात सुरक्षित नाही असे म्हटले जातेच पण स्त्री ही केवळ समाजातच नाही तर आईच्या पोटातही सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती आहे.

या असुरक्षिततेची मोठी विकृत परमावधी देशाच्या राजधानीतच व्हावी ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे ? यमुनेच्या पाण्यात असा काय दुर्गुण आहे की ते प्राशन करताच माणसाच्या मनातला दुःशासन जागा होतो आणि त्याचे हात परस्त्रीची वस्त्रे उतरून तिच्यावर अत्याचार करण्यास शिवशिवायला लागतात ? आहे मात्र असे. देशाच्या राजधानीत दररोज एका असहाय मुलीवर किंवा स्त्रीवर सामूहिक बलात्कार होत असेल तर देशाच्या अन्य ठिकाणचे चित्र काय असेल ?

दिल्लीत काही नराधमांनी एका तरुणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचार केला आणि तिला  बसमधून ढकलून दिले. ही तरुणी आता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. हा प्रकार इतका घृणास्पद आणि धक्कादायक आहे पण राजधानीतल्या सुरक्षा व्यवस्थेला या प्रकाराने काही घाम फुटलेला नाही. इतकी ही यंत्रणा बधीर झाली आहे. त्यामुळे राज्यसभेत संसद सदस्यांनी सरकारवर आगपाखड करून आपल्या रागाला वाट करून दिली.

कोणाही संवेदनशील हृदयाच्या माणसाच्या मनाला पाझर फोडणारी ही घटना आहे. चित्रपट अभिनेत्री असलेल्या खासदार जया बच्चन यांना तर या संबंधात आपली मते मांडताना आणि आपले विचार व्यक्त करताना आपल्या भावना आवरल्या नाहीत. त्यांनी आपले भाषण आसवे गाळतच केले. सरकार आता काय करणार आहे ? सरकारी यंत्रणा फारच बोथट असते. आपल्या समोर आलेल्या समस्येचे सामाजिक पैलू त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. ते कधीही असल्या घटनेतून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करीत असतात.

दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून बलात्काराचे प्रकार एवढे घडत आहेत की, आता या शहराला देशाची राजकीय राजधानी न म्हणतात बलात्काराची राजधानी म्हटले जायला लागले आहे. या शहरात केवळ बलात्कारच नाही तर अन्यही अपराध एवढे वाढले आहेत की माणसाचे जीवन असुरक्षित वाटावे. तिथे दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले होते की, या शहरातल्या ८० टक्के महिला आपल्याला असुरक्षित समजतात.

आपण घराच्या बाहेर पडलो तर कोणा गुंडांच्या तावडीत सापडणारच नाही आणि आपण सहीसलामत घरी पोचूच याची काही शाश्वती नाही असे ८० टक्के महिलांना वाटते. या सगळ्या महिला कधी ना कधी कोणाच्या वासनेला बळी पडलेल्या आहेतच असे काही नाही पण वातावरणच असे तयार झाले आहे की एवढ्या महिला स्वतःला असुरक्षित मानायला लागल्या आहेत. ही तर दहशतवादाची रीत असते. ते घातपाती घटना फार कमी करतात पण त्यांची भीती मात्र सर्वांना वाटत असते. तशी अवस्था दिल्लीच्या महिलांची झाली आहे.

सरकारी यंत्रणा नेहमीच कोणताही प्रश्न समोर आला की आकडेवारीचा आधार घेऊन सदर गुन्ह्याचे प्रमाण कमी कसे होत आहे हे पटवण्याचा प्रयत्न करीत असतात. दिल्लीत तसेच घडते. बलात्काराच्या घटना एखाद्या टक्क्याने कमी होत आहेत असे दिसले की ते लगेच स्थिती सुधारत असल्याचे सांगायला लागतात. पण त्याच्याशी त्यांच्या कर्तव्यपालनाचा किवा त्यांच्या खबरदारीच्या उपायांचा काही संबंध नसतो. त्यांनी हे प्रकार कमी व्हावेत यासाठी काहीच केलेले नसते. असे काही प्रकार घडले की बलात्कारासाठी कडक शिक्षा सुनावली जावी अशी सूचना हमखासपणे पुढे येते पण कायदा तज्ञांना ती सूचना काही केल्या पटत नाही.

सामान्य माणसाला यापेक्षा वेगळी काही उपाय योजना सुचतही नाही. मात्र आपण सर्वांनी जरा बारकाईने आणि मानसशास्त्राचा आधार घेऊन या प्रवृत्तीमागची कारणे शोधली पाहिजेत आणि काहीतरी शास्त्रशुद्ध उपाय सुचवले पाहिजेत. सामान्यतः कोणत्याही समस्येचे मूळ सामाजिक असते आणि त्या मूळाशी गेले की त्या समस्येचा परिहार होत असतो. या समस्येमागे महिलांकडे बघण्याचा वाईट दृष्टीकोन हे कारण आहे. या दृष्टीकोनात बदल झाला की या समस्येची हळुहळू सोडवणूक होत असल्याचे दिसायला लागेल.

समाजातले पुरुष शिकले तरीही त्यांच्या दृष्टीकोनात काहीच बदल होत नाही. तो घडवावा लागेल. पूर्वी स्त्रीया शिकत नसत म्हणून त्यांना कमी लेखले जात असे पण, आता  ती शिकली तरीही तिला समाजात आणि कुटुंबात प्रतिष्ठा नाही. घरातून होणारी मारहाण, हुंड्यासाठी छळ, बलात्कार आणि अपहरण या प्रकारांत काहीही बदल नाही. उलट बलात्काराची प्रकरणे प्रचंड वेगाने वाढत आहेत. महिलांच्या विरोधात केल्या जाणारया गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्या सुरक्षित नाहीत.आजूबाजूला बदलणारे वातावरण आणि माध्यमांचा परिणाम यामुळे हे घडत आहे. माध्यमांतून स्त्रीकडे उदारपणे पाहण्याचा संदेश देणारया मालिका दाखवल्या जाव्यात आणि मुलांना लहानपणा पासूनच स्त्रीयांकडे आदराने पहायला शिकवावे लागेल तरच हे वातावरण बदलणार आहे. शाळांतून आणि शिक्षण संस्थांमधूनही हाच संस्कार विद्यार्थ्यांवर केले गेला पाहिजे..

Leave a Comment