जगातले सर्वाधिक आनंदी लोक लॅटिन अमेरिकेत

देशाची प्रगती अथवा जगातील त्याचे स्थान निश्चित करताना दर डोई उत्पन्न, साधनसुविधा, उद्योग अशा अनेक बाबींचा विचार केला जात असतो. मात्र आता नव्या पद्धतीत देशाचा विकास आणि विविध योजना राबविताना ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संकल्पनाही विचारात घेतली जात आहे. याला हॅपीनेस इकॉनॉमिक्स असे संबोधण्यात येते. देशातील लोक किती आनंदी, समाधानी आहेत याचा हा आलेख असतो.

यानुसार गॉलप इंक या संस्थेने जगातील १४८ देशात प्रत्येक देशातील १ हजार नागरिकांचे या सबंधी सर्वेक्षण केले तेव्हा आश्वर्यकारक माहिती हाती आली. जगात सर्वाधिक श्रीमंत देश म्हणून ओळख असलेला कतार, सर्वात जास्त दीर्घायुषी नागरिक असलेला जपान, कॉलेज युवकांची मोठी संख्या असलेला कॅनडा या देशांना पहिल्या दहा देशातही स्थान मिळालेले नाही असे या सर्वेक्षणातून दिसले तर पहिल्या दहात जेथे गरीबी, गुन्हेगारी, हत्या जास्त प्रमाणात होतात त्या लॅटिन अमेरिकेतील सात देश सर्वात आनंदी नागरिकांचे देश म्हणून पुढे आले आहेत.

या सर्वेक्षणात हसतमुख, मैत्रीपूर्ण वागणारे नागरिक, त्यांचे राहणीमान, देशात त्यांना नागरिक म्हणून मिळत असलेला मान, नवनवीन आणि मनोरंजक गोष्टी शिकण्याकडे असलेला कल, आणि त्यांच्यात असलेले एन्जॉयमेंटची भावना अशा विविध बाबी लक्षात घेतल्या गेल्या. यात पनामा आणि पेरूग्वे या देशांनी प्रथम क्रमांक मिळविला कारण या देशातील ८५ टक्के नागरिक आनंदी आहेत असे आढळले. त्या पाठोपाठ एल साल्वाडोर, व्हेनेझुएला, त्रिनिदाद, टोबॅगो, थायलंड, ग्वाटेमाला, फिलिपिन्स, इक्वेडोर, कोस्टारिका यांचा नंबर लागला. विशेष म्हणजे सातव्या नंबरवर असलेल्या ग्वाटेमालात गेली कांही दशके सातत्याने युद्ध सुरू असून जगातील सर्वाधिक हत्या याच देशात झाल्या आहेत. तरीही येथील लोक आनंदी आहेत. समृद्ध आणि विकसित समजल्या जाणार्याह फ्रान्स आणि जर्मनी या देशांचा नंबर ४७ वा आहे.

या सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले की विकसित देशातील नागरिकांत असमाधान जास्त आहे तर गरीब देशातील लोकांत पॉझिटिव्ह थिकींग चांगल्या प्रमाणात आहे. अशा सर्वेक्षणातून मिळालेल्या आकडेवारीचा उपयोग संबंधित देश सरकारने कोणत्या योजना राबवायला हव्यात, कोणती ध्येये धोरणे ठरवायला हवीत ज्यामुळे देशाचा विकास साधणे शक्य होईल हे ठरविण्यासाठी केला जातो. भूतान हा असा देश आहे जेथे दरडोई उत्पन्नाबरोबरच ग्रॉस नॅशनल हॅपीनेसही देशाची धोरणे ठरविताना विचारात घेतला जातो.