विवाह संस्थेचे बदलते रूप

आपल्या देशामध्ये कुटुंब नियोजनाचा आग्रह, बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण यामुळे विवाह संस्थेवर खूप सखोल परिणाम झालेला आहे. विवाहाच्या संबंधात ग्रामीण भागातली परिस्थिती आणि शहरातली परिस्थिती यामध्ये अनेक प्रकारच्या विसंगती दिसायला लागल्या आहेत. विवाहा संबंधीच्या कल्पना आणि विवाहाच्या पध्दती यामध्ये सुध्दा अनेक बदल झालेले आहेत. ग्रामीण भागात अजूनही बालविवाहाची प्रथा आहे. बालविवाह म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर दहा-बारा वर्षाची मुले आणि आठ-दहा वर्षाच्या मुली लग्नाच्या मांडवामध्ये उभ्या असलेल्या दिसायला लागतात. असा बालविवाह अजून तरी महाराष्ट्रात फारसा रूढ नाही. परंतु राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात त्यांचे प्रमाण जास्त आहे.

कायद्याने १८ वर्षांच्या आतील मुलीचे लग्न करण्यास मनाई केलेली आहे. तरीही १४ ते १८ या वयोगटातील मुलींचे आणि २१ वर्षांची अट असतानाही १५ ते २० वर्षे वयोगटातील मुलांचे विवाह महाराष्ट्रात सरसकट केले जातात. कायद्याच्या भाषेत हा बालविवाहच असतो. मात्र वधु-वरांच्या पालकांना तो योग्य वयातला विवाह वाटतो.        

ग्रामीण भागात हे चित्र असताना शहरात मात्र त्याच्या नेमके उलटे चित्र आहे. शहरातली मुले आणि मुली यांच्या विवाहाचे वय फारच वाढलेले आहे. ते २५ ते ३० वर्षे झालेले आहे. शहरातल्या मध्यमवर्गीय तरुणांचा जीवन-क्रम ठरलेला असतो. जमेल तेवढे शिक्षण पूर्ण करणे हा त्याच्या जीवनातला पहिला टप्पा असतो. जेवढे शिक्षण झाले असेल तेवढ्या शिक्षणावर मिळू शकेल अशी नोकरी मिळविणे आणि नोकरी मिळून थोडी स्थिरता आली की लग्न करणे. ह्याच क्रमाने बहुतेकांची वाटचाल होत असते. शिक्षण झाले की नोकरी, नोकरी लागली की छोकरी. पण आजकाल शिक्षणाचे एवढे व्याप वाढत चालले आहेत की निव्वळ पदवी प्राप्त केली की लगेच नोकरी मिळत नाही. कोणती तरी पदवी हे बेसिक क्वॉलिफीकेशन ठरलेले आहे आणि नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक झाले आहे.

एखाद्या तरुणाने एखादा असा व्यावसायिक अभ्यासक्रम निश्चित केलेला असतो की त्यासाठी पदव्युत्तर पदवी मिळविणे आवश्यक असते. देशातली कुठलीही पदव्युत्तर मिळवायची म्हटले की दहावी नंतर कमीतकमी  ७ वर्षे शिक्षण घ्यावेच लागते. ती ७ वर्षे संपल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि नंतर नोकरी. ती नोकरी परमनंट होऊन निदान स्वतःचे भाड्याचे घर मिळवायचे म्हटले तरी सहज वयाची २८ ते ३० वर्षे जातात. त्यामुळे आता सर्वसाधारणपणे लग्नाचे वय ३० च्या आसपास यायला लागले आहे. असाच क्रम मुलीच्या आयुष्यात घडतो त्यामुळे त्यांच्याही लग्नाचे वय २५ वर्षाच्या आसपास यायला लागले आहे.

परंतु इतकी वर्षे विवाहाविना थांबणे आताच्या तरुणांना शक्य होत नाही. विशेषतः शिक्षण घेत असताना एखाद्या जोडीदारात मन गुंतले असेल तर ते प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर जवळपास ७-८ वर्षे विवाहासाठी थांबणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे काही तरुण मुले-मुली लग्नाविषयी वेगळाच विचार करायला लागली आहेत. मुंबईमध्ये विवाह नोंदणी कार्यालयात जे विवाह होत आहेत. त्यांचे विश्लेषण केले असता हा एक आगळावेगळा प्रकार पुढे आला आहे. संसार सुरू करायचा तेव्हा करू पण लग्न मात्र लवकर उरकून टाकू असा विचार करून कित्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वयाच्या २१ आणि १८ वर्षे पूर्ण होताच परस्परांना विवाहमाला घातल्या आहेत. मुंबईच्या विवाह नोंदणी कार्यालयामध्ये नोंदलेल्या १ हजार विद्यार्थ्यांपैकी ३५० विवाह अशा प्रकारचे आहेत. हे विवाह झालेले उभयतांच्या मातापित्यांना माहीत नाही.

मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही. लग्न होऊनही ती माहेरीच रहात आहे. नोकरी मिळून जागा मिळून स्थैर्य प्राप्त झाले की लग्नाची माहिती घरच्या लोकांना द्यायची असा या लोकांचा बेत आहे. पूर्वीही असे विवाह होत असत. ते बाल विवाह असत आणि मुलामुलींच्या आईवडिलांच्या संमतीने होत असत आणि मुलगी वयात आली की ती नांदायला आपल्या सासरी जात असे. हा प्रकार साधारण असाच आहे परंतु तो आई वडिलांच्या परस्पर झालेला आहे. अशा विवाह समारंभाला काही मित्र, मैत्रिणी आणि भटजी हजर असतातच त्यामुळे या लग्नाची बातमी किती दिवस गोपनीय राहते हे माहीत नाही. पण हा नवा प्रवाह विचार करायला लावणारा आहे.

आपण अमेरिकेतल्या सामाजिक परिस्थितीची नेहमीच चर्चा करतो परंतु तिथली परिस्थिती आणि तिच्यातले प्रवाह आपल्याकडे बघता बघता कसे वेगाने आलेले आहेत हेही आपण पहात आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनापासून किंवा बदलापासून दूर असलेलाही एक समाज आपण ग्रामीण भागात पहात आहोत. आपण एकविसाव्या शतकात आल्याच्या गप्पा कशा निरर्थक आहेत हे या दोन्हींवरूनही लक्षात येते.

Leave a Comment