लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली: शासकीय नोकरीत बढतीसाठी आरक्षणाच्या विधेयकावर लोकसभेत मोठ गदारोळ झाला. या गोंधळातच विरोधी पक्षांच्या महिला सदस्यांनी दिल्लीत बसमध्ये युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराचा निषेध करीत महिलांच्या संरक्षणाची मागणी लाऊन धरली.

सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोर जाऊन आरक्षण विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय जनता पक्ष अणि शिवसेनेच्या महाराष्ट्रातील सदस्यांनी कापसाला ६ हजार रुपये दर मिळावा या मागणीसाठी नारेबाजी केली; तर शिवसेना, अकाली दल, जनता दल, भाजप या पक्षाच्या महिला सदस्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा असून त्याबद्दल चर्चा व्हायलाच हवी; अशी भूमिका घेत लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांनी या चर्चेसाठी नोटीस देण्याची सूचना महिला सदस्यांना केली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

दुपारच्या सत्रात पुन्हा कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी संसदीय कार्य मंत्री नारायण सामी यांच्या हातातून आरक्षण विधेयकाच्या मसुद्याचा कागद घेऊन तो फाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या सदस्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल गेला. विलास मुत्तेमवार यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सपच्या सदस्यांनी अधिकंच गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

या प्रकारानंतर पत्रकारांशी बोलताना सपचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी कोणाचे नाव न घेता सपच्या सदस्यांना मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

Leave a Comment