पुण्यात कलमाडींना अनेक पर्याय – माणिकराव ठाकरे

पुणे दि.१९ – पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांच्याऐवजी आगामी लोकसभा निवडणुकांत पुण्याच्या खासदारपदासाठी काँग्रेसकडे अनेक पर्याय असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते पत्रकारांशी बोलत होते. अर्थात लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ असल्याने योग्य वेळ येताच पुण्यासाठीचा उमेदवार जाहीर केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यातच अखिल भारतीय काँग्रेस समितीने पुण्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी केवलसिंग धिल्लन यांना निरीक्षक म्हणून पाठविले होते. धिल्लन यांनी पुणे भेटीत राजकीय नेते, निवडून आलेले प्रतिनिधी व पक्ष कार्यकर्त्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या होत्या. धिल्लन यांनी त्यांचा अहवाल काँग्रेस हायकमांडला सादर केला असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून लॉबिंग सुरू केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेस बाहेरचा उमेदवार पुण्यासाठी देईल असा अंदाज कांही वरीष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

याविषयी विचारले असता ठाकरे म्हणाले की अजून निवडणुका दूर आहेत. तयारीला पुरेसा वेळ आहे आणि योग्य वेळ येताच उमेदवाराचे नांव जाहीर केले जाईल. सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ भ्रष्टाचारप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून निलंबित केले आहे. मात्र त्यांनी आपण पुण्याची लोकसभा निवडणूक लढविणार आहोत असे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्या दृष्टीने कलमाडी समर्थकांचा गट सक्रीय झाला असून कलमाडींवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी गाठीभेटी सुरू झाल्या आहेत असेही समजते. राज्यातूनही कलमाडी यांच्याच नांवाला पाठींबा मिळविण्याचे सर्व प्रयत्न सुरू झाले आहेत.

मात्र कलमाडी विरोधक गटानेही आपल्या हालचाली सुरू केल्या असून पुण्यातून मोहन जोशी, प्रवक्ते अनंत गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच आमदार शरद रणपिसे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचेही दिसून येत आहे.

Leave a Comment