सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेही असते जनमत – मोदी

अहमदाबाद दि.१८ – सत्ताधारी पक्षाविरोधात जनमन आपोआपच तयार होत जाते असा आजपर्यंतचा निवडणूक निकालातला महत्त्वाचा विचार आता गुजराथचे निकाल अंदाज वर्तविताना तरी राजकीय तज्ञांनी बदलावा आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूनेही जनमत तयार होते अशा नव्या दृष्टीनेही या विचाराकडे पाहावे असे गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकांसाठीचे मतदान संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपाला गुजराथेत स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तविले गेले आहेत पण यावर्षी सर्वात महत्त्वाचे ठरले ते मतदानाची वाढलेली टक्केवारी. मतदारांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता असेही मोदी यावेळी म्हणाले. भाजपच्या खानपूर कार्यालयात मोदी आले होते तेव्हा ते पत्रकारांशी बोलले. आपले मतदान करून मोदी पाच वर्षात प्रथमच भाजप कार्यालयात आले . त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी समर्थकांनी एकच गर्दी केली होती. अर्धा दिवस मोदी या कार्यालयात होते. त्यांनी येथे गुजराथ राज्यसभा खासदार व भाजपचे वरीष्ठ नेते अरूण जेटली यांच्याबरोबर मतदान आणि निकालांसंबंधी चर्चा केली.या बैठकीला राज्य भाजप उपाध्यक्ष कौशिक पटेल, महासचिव भिकुभाई दलसानिया व अन्य वरीष्ठ नेतेही उपस्थित होते असे समजते. काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात आलेले नरहरी अमीन यांनीही येथे येऊन मोदींची भेट घेतली.

दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी पत्नीसह आपला मतदानाचा हक्क भाजप कार्यालयाच्या जवळच असलेल्या मतदार केंद्रावर बजावला आणि तेही भाजप कार्यालयात आले. मोदींशी त्यांची चर्चाही झाली तेव्हा मोदींनी आडवानींना भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल याची खात्री दिली. त्यानंतर आडवानी दिल्लीला रवाना झाले असे समजते.

Leave a Comment