ब्रिटीश वास्तूरचनाकार डेव्हीड ग्रुनबर्ग आणि हेन्री वुल्फरन यांनी आठ विविध आकार धारण करू शकणारे स्मार्ट घर तयार केले असून सीझन व हवामान तसेच सूर्यप्रकाशाप्रमाणे हे घर आपला आकार बदलू शकते असा त्यांचा दावा आहे. या घरावर लावलेल्या सोलर पॅनलचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येतो कारण हे घर सूर्याच्या गतीप्रमाणे फिरू शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.
या घरांच्या निर्मितीसाठी त्यांनी स्वतःची डी हाऊस ही कंपनी स्थापन केली आहे. २० व्या शतकातील गणिती व डी डायनामिक्स पझलचे निर्माते हेन्री डन्डेनी यांनी १९०३ सालात समभुज त्रिकोणाचे चार पार्ट करून त्याचा चौकोन करता येतो हे सिद्ध केले होते. त्याच सिद्धांताचा वापर या घरासाठी केला गेला आहे. हिवाळा, उन्हाळा, दिवस रात्र या नुसार हे घर फिरू शकते. या घराच्या बाहेरच्या भिती जाड आहेत तर आतल्या काचेच्या आहेत. बाहेरच्या भिती फोल्ड करता येतात व आतील भिंती बाहेर सरकवता येतात. खिडक्यांची दारे करता येतात तर दारांच्या खिडक्या करता येतात. दोन बेडरूम, लिव्हिंग रूम व बाथरूमच्या जागाही बदलता येतात यामुळे हिवाळ्यात पूर्ण वेळ सूर्यप्रकाश मिळविता येतो तर उन्हाळ्यात जागा बदलली की सावली मिळविता येते असा या संशोधकांचा दावा आहे.
शिवाय या घरावर सोलर पॅनल्स बसविली गेली असल्याने घरासाठीची वीजही निर्माण होते. विशेष म्हणजे संशोधक ग्रुनबर्ग याने विद्यार्थी दशेत असतानाच या घरासंबंधी प्रोजेक्ट तयार केला होता असे सांगण्यात येत आहे. डी हाऊस कंपनी या घरांमुळे वास्तूरचनेत क्रांती घडवेल असाही विश्वास त्याने व्यत्त* केला आहे. या घरांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम होण्यासाठी मात्र अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.