पालकच लांबवितात मुलांची लग्ने

marriage3

भारतात तरूण पिढी लग्नाचा विचार आजकाल लवकर करत नाही असे सर्रास अनुभवास येत आहे. मात्र परदेशात हा ट्रेंड पूर्वीपासून होता. ठराविक मेकची गाडी, घर आणि अन्य प्रापंचिक वस्तूंची जुळवाजुळव झाल्यानंतरच तेथील लग्न ठरलेली जोडपीही विवाह करण्याचा विचार करतात असे दिसून येत असे. परिणामी लग्नाचे वय अधिक होते. मात्र या सार्यां ना फाटा देणारे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले असून आजकालच्या तरूणांना २५ हेच लग्नाचे योग्य वय वाटते मात्र पालकच आपल्या मुलांची लग्ने लांबवितात असे या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
 
ब्रिहॅम याँग विद्यापीठातील ब्रायन विलो यांनी या संबंधी संशोधन केले असून त्यासाठी त्यांनी पाच विविध विद्यापीठातील सुमारे ५०० हून अधिक युवक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी चर्चा केली. तेव्हा असे आढळले की युवा पिढीला लग्नासाठी पंचवीस हे अतिशय योग्य वय असल्याचे आणि त्या वयातच लग्न करायचे असल्याचे दिसले तर पालक मात्र मुलांनी अगोदर शिक्षण पूर्ण करावे आणि मग लग्नाचा विचार करावा अशा मताचे होते. पालकांच्या मते लग्नाचे योग्य वय २६-२७ आहे.

या संशोधनात असेही आढळले की मुले जे वय योग्य म्हणतात, त्यापेक्षा १ ते २ वर्षे अधिक वय पालक योग्य ठरवितात. या पालकांशी सविस्तर चर्चा केली तेव्हा त्यांच्या मनात मुलांची लग्ने लवकर झाली तर ती लवकर प्रौढ होतील ही भीती होती असेही आढळले असे ब्रायन यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment