धावत्या ट्रेनमध्ये बांधली विवाहगाठ

दोघे गाडीत बसले … दोघांनीही एकमेकांशी बोलणं सुरु केलं … अर्धा प्रवास होण्याआधीच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले … इच्छीत स्थळी उतरण्याआधी चक्क रेल्वेमध्येच या दोघांनी आपल्या जीवनाचा प्रवास एकत्र करण्याचे ठरवत सहप्रवाश्यांच्या साक्षीने लग्न केले … नवविवाहीत जोडपे एकत्रच रेल्वेच्या डब्यातुन खाली उतरले …

एखाद्या चित्रपटाची पटकथा असावी असे हे धावते लग्न पार पडले नवी दिल्ली ते हावडा दरम्यान धावणा-या पूर्वा एक्सप्रेस गाडीमध्ये. झाले असे की, दोन अनोळखी प्रवासी (मुलगा आणि मुलगी दोघांचीही नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत) दिल्लीहून हावडाला जाण्यासाठी पूर्वा एक्सप्रेसच्या एस-३ कोचमध्ये बसले . अनोळखी असणा-या दोघांची बोलता बोलता ओळख झाली.दिल्लीहून निघाल्यावर काही तासांच्या अंतरावर असणा-या उत्तर प्रदेशमधील अलीघर स्टेशनला पोहचेपर्यंत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . इतर सहप्रवाशांना दोघांनीही आपल्याला लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगून आमच्या लग्नाला साक्षीदार होण्याची विनंती केली .

प्रवाशांनीही आनंदाने मुला-मुलीच्या नातेवाईकांची जबाबदारी पार पाडत दोघांचे लग्न लावून दिले . त्याच डब्यात प्रवास करणा-या पंडीत बुवांनी मंत्र उच्चार करत या धावत्या लग्न सोहळ्याला धार्मिक टच दिला . तर मुलाने सहप्रवासी महिलेकडे असणारे कुंकू मुलीच्या भांगेत भरुन तिला आपल्या जीवनाचीच सहप्रवासी बनवले .लग्न झाल्यानंतर त्यांना आपले लग्न १२-१२-१२च्या विशेष मुहुर्तावर झाल्याचे कळल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळत होते .

लग्नापर्यंतची गोष्ट फिल्मी स्टाइल झाली खरी पण व्हीलन शिवाय चित्रपटाला मज्जा कशी येणार ? त्यामुळे या लग्नात व्हीलनची भूमिका बजावली ती पोलिसांनी.. पोलिसांनी नवविवाहीत जोडप्याला टूंडला स्थानकात उतरवून त्यांची चौकशी केली . त्यावेळी आम्ही स्वखुशीने आणि एकमेकांच्या संमतीने लग्न केल्याचा जबाब दोघांनीही दिला . तसेच मुलाने आपल्या घरच्यांना या लग्नाबद्दल पटवून देणार असल्याचेही पोलिसांना सांगितले . मग पोलिसांनीच या जोडप्याला शुभेच्छा देत सोडून दिले.

Leave a Comment