सौरभ पटेल मोदींचे वारसदार?

अहमदाबाद दि.१४- गुजराथ निवडणुकांत पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे आणि १७ तारखेला दुसर्या  टप्प्याचे मतदान होत आहे. भाजपला पुन्हा एकदा जंगी विजयाची अपेक्षा आहे आणि त्याचवेळी नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रीय होतील असे संकेतही मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत गुजराथची धुरा मोदींचे विश्वासू सौरभ पटेल यांच्याकडे सोपविली जाईल असे खात्रीलायक वृत्त आहे.

वडोदरातून निवडणूक रिंगणात असलेले ५४ वर्षीय सौरभ पटेल अमेरिकेतून एमबीएची पदवी घेऊन आलेले आहेत आणि विवाहाच्या नात्याने ते धीरूभाई अंबानी यांचे नातलग आहेत. गुजराथमधील निवडणूकात मोदींचे ते कळीचे प्रचारक राहिले आहेत. माजी गृहमंत्री अमीत शहा यांना बनावट चकमक प्रकरणात अटक होऊन गृहमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर पटेल हेच मोदींचे सर्वात जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत.

यामुळेच आत्ताच्या निवडणुकीत पटेल यांना त्यांची मूळची भावनगर ग्रामीण भागातला मतदारसंघ सोडून भाजपा साठी सुरक्षित आणि खात्रीच्या असलेल्या वडोदरातून तिकीट देण्यात आल्याचीही चर्चा होती. पटेल यांचे उद्योगजगताशी असलेले चांगले संबंध जसे महत्त्वाचे आहेत तसेच त्यांची वागण्याबोलण्यातली डिसेन्सी लक्षणीय आहे आणि त्यामुळेच मोदी राष्ट्रीय राजकारणात गेले तर मेादींचे वारसदार म्हणून पटेल यांचा विचार होऊ शकतो असे राजकीय तज्ञांचेही मत आहे.

अर्थात मोदींना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावायची असेल तर त्यांना गुजराथ निवडणूकीतही चांगली कामगिरी बजावावी लागणार आहे. गुजराथेच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले तरच मोदींचा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव होईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment