‘शिवतीर्थ’बाबत शिवसेनेचे पाऊल मागे

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्क येथे देण्यात आलेली तात्पुरती जागा रिकामी करून घेण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेने शिवाजी पार्कचा आग्रह मागे घेतला आहे. शहरात इतरत्र ‘शिवतीर्थ’ उभारण्यासाठी शिवसेनेने जागेचा शोध सुरू केल्याची माहिती शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी दिली.

शिवसेनाप्रमुखांचे अंत्यसंस्कार झालेले ठिकाण शिवसेनाप्रमुखांचे स्मारक ‘शिवतीर्थ’ म्हणून घोषित करावे; यासाठी बुधवारपर्यंत शिवसेना आग्रही होती. गुरुवारी आपल्या आग्रहाला थोडा मोडता घालत अंत्यसंस्काराच्या जागी उभारलेला चौथरा थोडा मागे सरकविण्याची तयारी दर्शविली. मात्र मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठाम भूमिका घेत हा चौथरा हटविण्याचा निर्धार जाहीर केला.

अंत्यसंस्कारासाठी केवळ एक दिवसासाठी देण्यात आलेल्या जागेबाबत शिवसेना दिलेला शब्द पाळत नसेल; तर ते अतिक्रमण समजून कारवाई केली जाईल; असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस दलाला दिले.

त्यानंतर मात्र शिवसेनेने नरमाईचे धोरण अवलंबिले आहे.

Leave a Comment