वाद स्मारकाचा

महाराष्ट्रात सध्या स्मारकांचे काही वाद गाजत आहेत. एखाद्या महापुरुषांचे अनुयायी आपल्या या दैवताचे योग्य स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांना स्मारकाचे महत्त्व पटलेले असते पण ते स्मारक आपण उभे न करता सरकारने उभे करावे असे त्यांचे म्हणणे असते. एकदा सरकारने ते मान्य केले की सारे काही सरकारी खर्चात होते. म्हणून ते सरकारकडे मागणी करायला लागतात आणि त्यातून आंदोलन निर्माण होते. सरकार एखाद्या विशिष्ट पक्षाचे असले की, त्या पक्षाच्या विचारसरणीला धरून स्मारके उभी करायला सरकार मदत करते पण काँग्रेसच्या राज्यात सावरकरांचे स्मारक होणार नाही आणि भाजपाच्या राज्यात इंदिरा गांधींचे स्मारक होणार नाही.

अशा प्रसंगी सरकार आणि आंदोलक यांच्यात संघर्ष सुरू होतो. आरोप प्रत्यारोप सुरू होतात. स्थिती चिघळते. काही स्मारके ही विचारांशी संबंधित नसतात. पण सरकार त्यांच्या उभारणीचा निर्णय करताना राजकारणाचा आणि मतांचा विचार करीत असते. ते स्मारक उभारल्याने त्या त्या विचारचे, जातीचे आणि संघटनेचे लोक राजकीय दृष्ट्या आपल्या जवळ येत असेल तरच सरकार अशा स्मारकाला हात घालते. तसा काही राजकीय लाभ नसेल तर सरकार फार हालत नाही आणि स्मारकाचा विचारही करीत नाही. अनुयायांसाठी तो जिव्हाळ्याचा विषय असतो पण सरकारसाठी तो राजकारणाचा विषय असतो. अधिक मते खेचणार्यास स्मारकाला पुढारी मंडळी गती देतात. पण ज्याच्या पुतळ्याने आपले काही कल्याण होणार नाही त्याच्या त्या पुतळ्याला सरकार सारखे वाटाण्याच्या अक्षता लावत असते.

अशा प्रसंगी फार आग्रह धरणे आणि सरकारने तो सतत डावलणे यातून राजकीय खेळ होतो पण तो ज्या महापुरुषाच्या स्मारकाबाबत सुरू असतो त्याला तो कमीपणा आणणारा असतो. कोणतेही महापुरुष काही आपले स्मारक व्हावे यासाठी कार्य करीत नसतात.  त्यांच्या अनुयायांना त्यांचे स्मारक व्हावे असे कितीही वाटत असले तरीही ती मागणी किती मर्यादेपर्यंत रेटावी यालाही काही मर्यादा असतात आणि ते स्मारक कसे व्हावे यालाही अनेक मर्यादा असतात. एकंदरीत स्मारकाचा विचार हा नेहमीच तारतम्याने केला पाहिजे. त्यात अवास्तवता असता कामा नये.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या  स्मारकाचा वाद आता निर्माण झाला आहे. शिवसैनिकांचे बाळासाहेबांवर फार प्रेम होते आणि ते शिवसैनिकांसाठी देव होते पण त्यांनी स्मारकाबाबत फार  भावनाशील  होता कामा नये. कारण बाळासाहेबांचे स्मारक सरकारने, सरकारी जागेत उभारावे अशी त्यांची इच्छा आहे आणि सरकार काही त्यांच्या इतके भावनाशील नाही. बाळासाहेब हे काही त्यांचे दैवत नव्हते आणि नाही. व्यवहारातच बोलायचे तर ते सरकारचे राजकीय प्रतिस्पर्धी होते.

शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मारकाची तातडी आहे तशी सरकारला नाही. याचा विचार करून  आताचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी  या संबंधातल्या शिवसैनिकांच्या आग्रहाला आवर घातला आणि अंत्यविधीचा चौथरा हेच स्मारक करण्याची मागणी मागे घेतली. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व संयमी आणि विचारी आहे हे या व अशाच प्रकारांवरून दिसून येत आहे पण त्यांच्या या धोरणाने  काही लोकांची पंचाईत झाली आहे. या काही लोकांनी स्मारका बाबत अतिरेकी आणि अवास्तव  भूमिका घेतली होती.

बाळासाहेबांचे  मातोश्री हे निवासस्थान हे त्यांचे स्मारक होऊ शकते. शिवसेनेचे मुख्यालय सेनाभवन हेही त्यांचे स्मारक होऊ शकते. तसे ठाकरे कुटुंबियांनी आणि जनतेने ठरवले तर हे होऊ शकते. पण मनोहर जोशी आणि  खासदार संजय राऊत यांनी याबाबत आग्रही मते मांडली होती. त्यांची आता पंचाईत झाली आहे.  मुंबई महापालिकेलाच बाळासाहेबांचे नाव द्यावे, अशी सूचना कोणी तरी मांडली होती पण ती आता मागे पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी प्रदीर्घ आंदोलनानंतर सरकारने इंदू मिलची जागा दिली आहे. त्यामुळे शिवसैनिकांनाही असाच प्रकार बाळासाहेबांच्या बाबतीतही घडावा असे वाटते पण  डॉ. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात खूप अंतर आहे. तेव्हा कोणीही कोणाशी बरोबरी न केलेली बरी. नसता त्यातून वेगळेच मुद्दे पुढे येऊन कटुता वाढू शकते. राज्य सरकारने बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी शिवाजी पार्कची जागा वापरायला दिली. अंत्यविधीसाठी तात्पुरता चौथरा बांधला. याबाबत मनाचा मोठेपणा दाखवला कारण तो प्रसंग राजकारण करण्याचा नव्हता.    
   
मात्र आताही सरकार तशीच भावना ठेवेल असे कसे शक्य आहे ? पण शिवसैनिकांना तसे वाटत होते.म्हणून त्यांनी हा तात्पुरता चौथरा कायम रहावा, तिथेच बाळासाहेबांचे स्मारक व्हावे अशा मागण्या करायला सुरूवात केली. शिवाजी पार्क हे नाव बदलून त्याला शिवतीर्थ असे नाव द्यावे, अशीही मागणी शिवसैनिकांनी केली. चौथरा हटवला जाऊ नये यासाठी शिवसैनिकांनी पहारा बसवला. शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी सुद्धा पार्कचे नाव बदलण्यास राजी नाही.

बाळासाहेब शिवसेना प्रमुख झाल्यानंतर त्यांनी ५२ वर्षे याच शिवाजी पार्कवर सलगपणे दसरा मेळावा घेऊन जागतिक विक्रम केला आहे. म्हणून शिवाजी पार्कचे नाव बदलून शिवतीर्थ करावे असे त्यांना वाटते.पण  शिवाजी पार्क हे शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. महाराष्ट्रातल्या कोणालाही हे नामांतर पचनी पडणार नाही. शिवसैनिकांनी याचा विचार केला पाहिजे. त्यांनी तो केला नसला तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांना ते उमगले आहे आणि स्मारकाच्या प्रकरणात ते एक पाऊल मागे गेले आहेत.

Leave a Comment