काँग्रेसची लोकसभा निवडणूक तयारी जोरात

नवी दिल्ली दि,१४ – मनमोहनसिग यांचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल अशी खात्री देणार्याि काँग्रेसने २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली असल्याचे समजते. पुढच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकार अनेक महत्त्वाचे कायदे पास करत आहे आणि त्याचवेळी पक्षाचे निवडणुक जनरल सेक्रेटरी राहुल गांधी यांच्याकडे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तीन पात्र उमेदवारांची यादीही तयार झाली आहे.

लोकसभा निवडणुकांत प्रत्येक मतदारसंघासाठी तीन उमेदवार निवडण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता आणि त्यासाठी ५४ निरीक्षकांची टीमही प्रत्येक राज्याचा दौरा करण्यासाठी नियुक्त करण्यात आली होती. यातील बहुतेक निरीक्षकांनी आपले अहवाल गांधी यांच्याकडे सूपूर्द केले असल्याचे समजते. कॅश ट्रान्स्फर प्रोग्रॅमचा चांगला लाभ काँग्रेसला होईल असेही अंदाज या निरीक्षकांनी वर्तविले आहेत.

या संदर्भात आणि एकूण मतदारसंघांचा हालहवाला घेण्यासाठी राहुल गांधी, अर्थमंत्री चिदंबरम आणि ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांच्यात १ जानेवारीपासून वॉर रूम बैंठकाही सुरू होत असल्याचे वृत्त आहे. उमेदवार निवड करताना सध्या प्रत्येक राज्याचे राज्य प्रमुख, वरीष्ठ नेते यांचीही मते विचारात घेतली गेली असली तरी अंतिम निवड करताना जिंकून येण्याची क्षमता हाच निकष लावला जाईल असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment