संगीत प्रचारातले ऋषी

सतार वादक पंडित रवि शंकर यांचे काल अमेरिकेत निधन झाले. नव्या पिढीतल्या कलाकारांना कदाचित आपल्या कलेच्या क्षेत्रात रवि शंकर यांचे नेमके स्थान काय हे माहीत नसेल. आज भारतीय कलांचा विश्व संचार वेगाने सुरू आहे पण तो विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात असा नव्हता. किंबहुना पाश्चात्याचे सारे काही चांगले आणि आपले म्हणजे भारतीयांचे सारे काही मागासलेले, जुनाट अशी कल्पना असण्याचा तो काळ होता. तेव्हा केवळ पंचविशीतल्या रविशंकर यांनी परदेशात जाऊन तिथल्या श्रोत्यांनी सतार ऐकवून त्यांच्या मनात भारतीय संगीताविषयी आस्था निर्माण केली होती.  त्यांच्या केवळ सतार वादनाच्या अक्षरशः शेकडो मैफिली  अमेरिकेत आणि यूरोपातल्या अनेक देशात झालेल्या होत्या.

रविशंकर वाराणसीचे आणि सनई वादक बिस्मिलाखान हेही त्याच गावचे. बिस्मिलाखान यांनी सनई या लुप्तप्राय होत चाललेल्या वाद्याला संजीवन दिले आणि याही वाद्याच्या मैफिली होऊ शकतात हे सिद्ध करून दिले. तसेच रवि शंकर यांनी सतार हे तंतूवाद्य हजारो रसिकांना तासनतास डोलवू शकते हे दाखवून दिले. आता एकेक कलाकार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पं. भीमसेन जोशी,  बिस्लिमा खान हे कलाकार खरेच आपापल्या क्षेत्रातले एव्हरेस्ट शिखर होते. त्यांच्या जीवनाचा विचार करायला लागल्यावर त्यांच्या तपःश्चर्येपुढे आणि त्यांच्या  समर्पणवृत्तीपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. म्हणून त्यांचे जाणे ही भारताच्या कला विश्वाची मोठी हानी आहे.

यूरोपातल्या अनेक सरकारांनी आणि अमेरिकेच्या प्रशासनानेही रविशंकर यांचे संगीताच्या क्षेत्रातले योगदान मान्य केले होते. म्हणूनच त्यांना या सगळ्या देशांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होतेच पण १९६६ साली त्यांना जगातला सर्वात श्रेष्ठ भारतीय संगीत तज्ञ अशा शब्दात गौरविण्यात आले होते. अमेरिकेतल्या ऑल म्युझिक ग्रुपच्या केन हंट यांनी रवि शंकरचा हा सन्मान केला होता. सतार हा त्यांचा प्राण होता. जगभर भारतीय संगीत लोकप्रिय करणे हा त्यांचा ध्यास होता. ते सतारीसाठीच जगले इतके ते या वाद्याला समर्पित होते. तिच्यासाठी झपाटल्यागत काम करीत होते. १९९० साली त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती पण त्याच वर्षात त्यांनी त्याही अवस्थेत यूरोपात आणि अमेरिकेत ४० मैफिली रंगवल्या.

भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण, पद्मविभूषण आणि नंतर १९९९ साली भारत रत्न हा किताब दिला होता. त्यांच्या घराण्यात गायन वादनाची कसलीच परंपरा नसतानाही रविशंकर यांना संगीताचा आणि त्यांचे बंधू  उदर शंकर यांना नृत्याचा नाद लागला. रवि शंकर हे मुळात बंगाली असले तरी त्यांचे वडील राजस्थानातल्या झलवार संस्थानात दिवाण होते. श्याम शंकर चौधरी हे त्यांचे नाव. त्यांना सात मुले झाली. त्यात रवि शंकर हे सातवे. श्याम शंकर हे वकिली करायला लंडनला गेले. हेमांगिनी देवी या मुलांना घेऊन वाराणसीला गेल्या. तिथे रवि शंकर यांचे बालपण गेले. ज्येष्ठ बंधु उदय शंकर आणि रवि शंकर या दोघांची बाल वयातच कलेत चांगली प्रगती होत होती. 

रवि शंकर हे उदय शंकर यांच्या नृत्य समूहात नृत्य करायला लागले तेव्हा त्यांचे वय होते केवळ दहा वर्षे. त्यांनी या बाल वयातच या समूहासह यूरोपचे दौरे केले. आपण काही तरी वादन शिकले पाहिजे असे वाटायला लागले. तेव्हा त्यांच्या नर्तक बंधूंनी त्यांना  सतार शिकण्याचा सल्ला  दिला. त्यासाठी त्यांनी  अल्लाउद्दीन खान यांचे शिष्यत्व पत्करावे असेही सुचवले. त्या प्रमाणे १९४४ पर्यंत ते मैहर संस्थानात अल्लाउद्दीन खान यांच्या घरात राहून शिकले. १९४४ साली त्यांनी सत्यजित रे यांच्या अप्पू त्रिलोगी या चित्रपटाला संगीत दिले. यावेळी त्यांचे वय केवळ २४ वर्षे होते. पण ते फार लोकप्रिय झाले. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना  आकाशवाणीचे संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी मिळाली.  ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याला त्यांनीच संगीत दिले.

शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी लहान मोठ्या संस्था स्थापन करणे, त्यांतून संगीताचा प्रसार करणे अशी त्यांची कामे सुरू झाली.१९४९ साली ते आकाशवाणीवर नोकरीला लागले. १९५२ साली त्यांचा यहुदी मेनुहीन या जागतिक कीतींच्या पण मूळ भारतीय असलेल्या संगीतकाराशी परिचय झाला होता. ते रशियात जाऊन भारतीय संगीताची मैफिल करून आले होते. १९५५ साली यहुदी मेनुहीन यांनी रवि शंकर यांना अमेरिकेत एका कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.  हा कार्यक्रम फोर्ड फौंडेशनने आयोजित केला होता. चांगले अमेरिकेतले निमंत्रण होते पण काही कौटुंबिक कारणावरून त्यांना परदेशी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले गुरू अल्लाउद्दीन खान यांचे चिरंजीव अली अकबर खान यांना आपल्या ऐवजी पाठवले.  अली अकबर खान यांचे कार्यक्रम वाहवा मिळवून गेले आणि रवि शंकर यांना आपलेही कार्यक्रम तिथे चांगले होतील अशी खात्री वाटली. १९५६ साली त्यांनी आकाशवाणीची नोकरी सोडली आणि ते परदेश दौर्याआवर गेले.नंतर ते सतत परदेश वार्यार करीतच राहिले.

Leave a Comment