भाजप आणि राष्ट्रवादीचे ‘पत्रिका युद्ध’

नागपूर: सिंचनाच्या श्वेतपत्रिकेवरून सिंचन विभाग अखत्यारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पत्रिका युद्धाला सुरुवात झाली आहे. श्वेतपत्रिकेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीने ‘सत्यपत्रिका’ प्रसिद्ध केली आहे; तर भाजपने त्यापूर्वीच ‘सत्यावर घाव’ पत्रिका प्रसिद्ध करून राष्ट्रवादीवर कुरघोडीचे प्रयत्न केले आहेत.

विरोधकांना महाराष्ट्राची अर्धवट माहिती असून ते सिंचनाबाबत जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत. त्यामुळे सिंचनाबाबत वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेसमोर यावी या भूमिकेतून राष्ट्रवादीने ‘सत्य पत्रिका’ प्रसिद्ध केली असल्याचे नबाब मलिक यांनी सांगितले आहे. विरोधकांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे कारस्थान रचले असून त्यासाठीच सिंचानाबाबत आरोप केले जात आहेत; असा आरोप करून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘आधी नीट माहिती घ्या आणि मग आरोप करा;’ असा सल्ला विरोधकांना दिला.

दुसरीकडे भाजपने सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीवर आगपाखड केली आहे. सिंचन श्वेतपत्रिकेतील माहिती अर्धसत्य असल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला; तर आमदार देवेंद्र फडणवीस यांनी; राष्ट्रवादीची सत्यपत्रिका म्हणजे असत्यपत्रिका असल्याची टीका केली.

Leave a Comment