पुन्हा घटली टेलिकॉम ग्राहकांची संख्या

नवी दिल्ली दि.१३- सप्टेंबरच्या तुलनेत आकटोबर अखेरीपर्यंत देशातील टेलिकॉम ग्राहकांची संख्या २५ लाखांनी कमी झाली असल्याचे ट्रायने जाहीर केले आहे. सप्टेंबरमध्ये ही संख्या ९३७.७० दशलक्ष होती ती आक्टोबरमध्ये ९३५.१८ दशलक्षांवर आली आहे. मोबाईल ग्राहकांची संख्याही ०.२६ टक्कयांनी घटली असून ती९०४.२३ दशलक्षांवर आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनेक मोबाईल सेवा पुरवठादारानी त्यांच्या सेवा डिसकनेक्ट केल्यामुळे ही संख्या घटली असल्याचे मत ट्रायने व्यक्त केले आहे.

असे असले तरी भारती एअरटेलची ग्राहकसंख्या सुमारे ५० हजारांनी वाढली असून ती १८६.४१ दशलक्षांवर गेली आहे तर त्यापाठोपाठ व्होडाफोनची ग्राहकसंख्या ४८ हजारांनी वाढून ती १५३.१४ दशलक्षांवर गेली आहे. तुलनेत बीएसएनएल व आयडिया सेल्युलर यांची ग्राहकसंख्या अनुक्रमे ३५ हजार व २४ हजारांनी वाढली आहे.

सर्वाधिक ग्राहक संख्या घटलेल्यात प्रथम क्रमांकावर टाटा टेलिसर्विसेस असून त्यांच्या संख्येत १६ लाखांनी घट झाली आहे. टाटा टेलिने यापूर्वीच जम्मू काश्मीर, ईशान्य भारत आणि आसाममध्ये सेवा खंडीत करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ युनिनॉर आणि रिलायन्स कम्युनिकेशन, व्हिडीओकॉन व लूप यांची ग्राहकसंख्या कमी झाली आहे. मात्र ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या वाढली असून ती १४.६८ दशलक्षांवर गेली असल्याचेही ट्रायच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment