पं. रविशंकर यांना लाईफटाईम अचिव्हमेंट ग्रॅमी पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार असून हा सोहळा लॉस एजेलिस येथे १० फेब्रुवारी २०१३ रोजी साजरा होणार आहे. रविशंकर यांच्याबरोबरच अन्य सहा कलाकारांनाही हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.
ग्रॅमीच्या प्रवक्त्या स्टेफाईन शेल या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाल्या की या पुरस्कारासाठी पंडितजींची निवड त्यांच्या मृत्यूनंतर केली गेलेली नाही. ही निवड त्यांच्या मृत्यूपूर्वीच केली गेली होती आणि त्याची माहिती पंडितजींना दिलीही गेली होती. पं.रविशंकर यांना यापूर्वी तीन वेळा ग्रॅमी अॅवार्ड मिळाले आहे. जगातील नामवंत सतारवादक असलेले रविशंकर हे आंतरराष्ट्रीय संगीताचे खरे राजदूत होते. परफॉर्मर, कंपोझर, शिक्षक व लेखक या सार्यााच भूमिका तोलाने पार पाडणारे पंडितजी भारतीय संगीताची पाश्चात्यांना ओळख करून देणारे पायोनिअर होते असे त्यांच्या या लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्डच्या मानपत्रात नमूद करण्यात आले असल्याचेही शेल यांनी सांगितले.
पं. रविशंकर यांच्याबरोबरच हा सन्माननीय पुरस्कार सिंगर किंग, शास्त्रीय पियानो वादक ग्लेन गौल्ड, जॅझ संगीतकार चार्ली हेडन, लिजंड हॉपकीन, मोटाऊन , पॅटी पेज यांनाही देण्यात येणार आहे.