चौथ्या दिवशीही विधानसभा ठप्प

नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही कोणतेही कामकाज न होता संपला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातल्याने कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच उपसभापती वसंत पुरके यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ‘सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या. त्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी देतो. महाराष्ट्रातील विविध स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी प्रश्नोत्तरे होऊ द्या; असे आवाहन पुरके यांनी विरोधी सदस्यांना केले. मात्र विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने उप सभापतींनी कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला पं. रविशंकर यांच्या निधनाबद्दल मांडलेला शोक प्रस्ताव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला.

त्यानंतर अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पुढील कामकाजाची घोषणा करताच विरोधकांनी एसआयटी चौकशीची घोषणाबाजी सुरूच ठेवली; तर सत्ताधारी सदस्यांनी ‘चर्चा करा; चर्चा करा; अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी तहकुबी देऊन कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली. मात्र कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिल्याने तालिका अध्यक्ष नबाब मलिक यांनी दिवसभरासाठी कामकाजासाठी तहकुबी दिली.

Leave a Comment