मुंबई पुन्हा अॅलर्टवर

मुंबई दि.१२ – दिल्लीतील गुप्तचर संस्थांकडून मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आदेश मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परिणामी मुंबईत गेले दोन दिवसांपासून महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे तसेच नाकाबंदी आणि गस्तही वाढविली गेली आहे.

वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नांव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सर्व पोलिस स्टेशन्सना सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे तसेच कांही अपवादात्मक घटनांत नाकाबंदीसाठी जादा कुमक बाहेरूनही मागविली गेली आहे. दहशतवादी हल्ले नक्की कुठे होणार याचा अंदाज नसल्याने सर्वत्रच सावधानता बाळगली जात असून झोपडपट्ट्या असलेल्या भागात कोबिग ऑपरेशन्स गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहेत.केंद्रीय गुप्तचर विभागाने देशातील मेट्रो म्हणजे मोठ्या शहरांना दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून त्यातही मुंबई आणि दिल्लीत जादा सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुंबई पोलिसांनी सम्रुद्र, जमीन आणि आकाश अशा तिन्हीही ठिकाणांपैकी कुठूनही हल्ला होऊ शकेल असे लक्षात घेऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे असेही या अधिकारयाने सांगितले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला फाशी दिल्यापासून मुंबईत सतत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण तालिबानी संघटनेने कसाबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी हल्ले करण्यात येतील असे यापूर्वीच जाहीर केले आहे.

Leave a Comment