सिंचन घोटाळ्याप्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल

नागपूर: उपमुख्यमंत्री पद ही व्यावहारिक तडजोड असली तरीही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेणे किंवा त्यांची सभागृहात ओळख करून देणे याला कोणतीही घटनात्मक आडकाठी नसल्याचा निर्वाळा विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

उपमुख्यमंत्री पदाचा घटनेत कोणताही उल्लेख नसल्याने अजित पवार यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि त्यांची सभागृहात उपमुख्यमंत्री म्हणून ओळख करून देणे अवैध असल्याचा पवित्र घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भाजप शिवसेनेने मूक मोर्चा काढला. याबाबतचा निर्णय वळसे पाटील यांनी राखून ठेवला होता.

मंगळवारी अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री पद सभागृहाच्या रूढी आणि परंपरेत सर्वमान्य आणि व्यावहारिक दृष्टीने महत्वाचे असल्याने त्या पदाची शपथ घेणे आणि त्यांची सभागृहाला ओळख करून देणे घटना विरोधी नसल्याचा निर्वाळा दिला.

या घोषणेनंतर विरोधकांनी अध्यक्षांच्या समोर येऊन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले.

त्यानंतरही विरोधकांनी सिंचन घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशीच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घोषणाबाजी करीत सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तब्बल ४ वेळा तहकूब करावे लागले.
विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून गोंधळ सुरू राहिल्याने सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

Leave a Comment