मुंबई महापालिका वॉर्ड कार्यालयाची तोडफोड

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादातून संतप्त शिवसैनिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या वरळी वॉर्ड कार्यालयाची मोडतोड केली. हा प्रकार सोमवारी रात्री उशीरा घडला.

शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या चौथर्याच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांचे समाधीस्थळ उभारावे अशी शिवसैनिकांची मागणी आहे. महानगरपालिकेने शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी ही जागा तात्पुरत्या स्वरूपात दिली असल्याने आता ती जागा रिकामी करून द्यावी अशी महापालिका प्रशासनाची मागणी असून त्यासाठी पालिकेने शिवसेना नेते संजय राऊत आणि महापौरांना नोटीसही बजावली आहे. मात्र शिवसैनिक ही जागा रिकामी करण्यास तयार नाहीत. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारावे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरात शनिवारपासून जमले असून त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान; विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी; शिवसेनेने शांततेने जागा रिकामी करून दिलेला शब्द पाळावा; असे आवाहन शिवसेनेला केले आहे. मात्र शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अधिवेशन सुरू होताच भावनिक भाषण करून; आम्हाला स्मारक उभारायचे नाही तर केवळ दहन संस्कार झालेल्या जागेवर समाधी उभारायची आहे; असे आवाहन सरकारला केले.

मात्र एकीकडे विधिमंडळात शिवसेना समजुतीची भाषा करीत असतानाच काळ सुमारे ७-८ जणांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाची मोडतोड केली. या प्रकारामुळे महापालिकेच्या २४ वॉर्ड कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment